भाजीपाला,अन्नधान्य पुरवठ्याच्या अडचणी सोडवण्यासाठी आठ वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण पथक तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 03:51 PM2020-03-26T15:51:10+5:302020-03-26T15:51:18+5:30
कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड, यांच्या आदेशाद्वारे गठीत झालेल्या या नियंत्रण कक्षात 24 तास संबंधीत अधिकारी किंवा त्यांचा प्रतिनिधी तैनात राहणार आहेत.
ठाणे : अन्नधान्य,भाजीपाला,फळे आदींचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी सर्वाधिक मोठ्या असलेल्या वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) कृषी, परिवहन, पुरवठा, पोलीस आदी विभागांच्या आठ वरिष्ठ अधिकाऱ्यां चे नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम ) कठीत करण्यात आले आहे, असे ठाणे जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने, यांनी सांगितले.
कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड, यांच्या आदेशाद्वारे गठीत झालेल्या या नियंत्रण कक्षात 24 तास संबंधीत अधिकारी किंवा त्यांचा प्रतिनिधी तैनात राहणार आहेत. वाशी येथील एपीएमसी मार्केट येथून अन्नधान्य, भाजीपाला, फळे आदींची आवक, जावक सुरळीत ठेण्याचे कार्य या कक्षातून केले जात आहे. या पुरवठ्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी, समस्या, येऊ नये आणि आल्यास त्या तत्काळ सोडवण्याची जबाबदारी या अधिकार्यांवर आहे. यामध्ये कृषी विभागाचे सहसंचालक, जिल्हा कृषी अधीक्षक, सहाय्यक पोलीस उपायुक्त, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुरवठा विभाग उपनियंत्रक, जिल्हा उपनिबंधक आदी अधिकारी वर्गाचा समावेश आहे.