वादग्रस्त मॉडेल पूनम पांडेने अभिनेत्याविरोधात केली विनयभंगाची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 12:14 AM2017-10-05T00:14:13+5:302017-10-05T00:26:44+5:30
आपल्याला फोनवरुन वारंवार अश्लील मेसेज पाठवून, लैंगिक अत्याचार करण्याची धमकी देण्यात येत असल्याची तक्रार ठाण्यातील प्रसिद्ध मॉडेल पूनम पांडे हिने राजीव खन्नाविरुद्ध दाखल केली आहे.
- विशाल हळदे/ जितेंद्र कालेकर
ठाणे: आपल्याला फोनवरुन वारंवार अश्लील मेसेज पाठवून, लैंगिक अत्याचार करण्याची धमकी देण्यात येत असल्याची तक्रार ठाण्यातील वादग्रस्त मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे हिने राजीव खन्ना या अभिनेत्याविरुद्ध दाखल केली आहे. याप्रकरणी बुधवारी रात्री वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
भारतीय क्रिकेट संघाने विश्वकप जिंकल्यास आपण निर्वस्त्र होऊन भारतीय संघातील खेळाडूंना मैदानावरच मिठी मारु, त्यांचे चुंबन घेऊ, अशी घोषणा २०११ मध्ये करण्याचा स्टंट करणा-या पूनम पांडेने देशभरात एकेकाळी खळबळ उडवून दिली होती. अर्थात, त्यावेळी तिने विवस्त्र होण्याऐवजी अर्धनग्न अवस्थेतील फोटो काढून ते प्रसिद्ध केले होते. त्यावर हे फोटो भारतीय क्रिकेट संघाला विश्वकप जिंकण्यास प्रेरीत करील, असे जाहीर केले होते. याच मॉडेलने आता राजीव खन्ना या अभिनेत्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. आपल्या तक्रारीमध्ये तिने म्हटले आहे की, ते वारंवार अश्लील मेसेज पाठवितात. तसेच नेटच्या आणि मोबाईलच्या माध्यमातून आपल्यावर लक्ष ठेवतात.
लैंगिक अत्याचार करण्याची तसेच ठार करण्याची ते धमकी देतात. अनेकदा मोबाईलवरुनही त्यांनी अशा प्रकारे धमकी दिली आहे. यासंदर्भात, ४ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तक्रार दाखल झाली असून खन्ना यांना चौकशीसाठी बोलविले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक बी. एस. तांबे यांनी सांगितले. विशेष म्हणजे नग्नतेमध्ये कोणतीही अश्लीलता नसून ते एक ग्लॅमर असल्याचाही दावा तिनेच एकेकाळी केला होता. तिच्या या तक्रारीचा अधिक तपशील मात्र मिळू शकला नाही.