वादग्रस्त पवार केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 12:39 AM2019-03-09T00:39:44+5:302019-03-09T00:39:49+5:30
केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार उपायुक्त सु.रा. पवार यांच्याकडे देण्यात आला आहे.
कल्याण : केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार उपायुक्त सु.रा. पवार यांच्याकडे देण्यात आला आहे. आयुक्त गोविंद बोडके यांनी ही जबाबदारी सोपवली असून, या आदेशाची नोंद त्यांच्या सेवापुस्तकात करावी, असेही आदेशात म्हटले आहे.
उपायुक्त पवार यांच्याकडे अनधिकृत बांधकाम विभाग होता. अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना बेकायदा बांधकामप्रकरणी लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तपद जूनपासून रिक्त होते. आयुक्तांनी पवार यांना या पदाची जबाबदारी देताना उपायुक्तपदही सांभाळावे, असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी आता महिला-बाल कल्याण, शिक्षण विभाग, वैद्यकीय आरोग्य विभाग, क्रीडा व सांस्कृतिक विभाग हे चार विभाग पाहावा लागणार आहे.
या विभागांतील आर्थिक बाबींशी निगडीत सर्व प्रस्ताव व प्रकरणे मंजुरीसाठी आयुक्त, स्थायी समिती सभापती, महासभा, लेखा परीक्षक व लेखा अधिकारी यांच्या परवानगीनंतरच सचिवांकडे पाठवावेत, असेही आदेशात नमूद केले आहे.
मात्र, पवार यांच्याकडे दिलेला पदभार हा अतिमहत्त्वाच्या विभागांचा नाही. तसेच पवार हे तीन महिन्यांनतर निवृत्त होणार आहेत. पवार यांना अतिरिक्त कार्यभाराचा वेगळा पगार दिला जाणार नाही. मात्र त्यांच्या सेवा पुस्तकात त्याची नोंद होणार आहे.
>महत्त्वाची खाती का नाहीत? : पवार यांना अतिरिक्त आयुक्त पदाची वाढीव जबाबदारी देताना त्यांना महत्त्वाची खाती का दिली नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दहा वर्षांपूर्वी पवार हे मालमत्ता विभागात उपायुक्त पदावर कार्यरत असताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने त्यांना अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर त्यांनी अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाकडे दाद मागितली होती. आयोगाच्या आदेशानंतर पवार यांना राज्य सरकारच्या आदेशानुसार पुन्हा महापालिकेच्या सेवेत रुजू करून घेतले होते.