उमेदवाराच्या पतीची वादग्रस्त चित्रफीत
By admin | Published: February 18, 2017 07:07 AM2017-02-18T07:07:57+5:302017-02-18T07:07:57+5:30
शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या दिव्यामधील नगरसेविका सुनीता मुंडे यांचे पती गणेश मुंडे यांची वादग्रस्त
ठाणे : शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या दिव्यामधील नगरसेविका सुनीता मुंडे यांचे पती गणेश मुंडे यांची वादग्रस्त चित्रफीत मतदानाला तीन दिवस शिल्लक असताना व्हायरल झाली आहे. यामध्ये अनधिकृत बांधकामे वाचवण्यासाठी मुंडे एका व्यक्तीकडून पैसे मागत असल्याचे दिसत असून यामुळे दिव्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. ही चित्रफीत निवडणूक आयोगाला पाठवण्यात येणार असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे, तर गणेश मुंडे यांनी मात्र ही चित्रफीत पूर्णपणे बनावट असल्याचा दावा केला असून पराभवाच्या भीतीनेच हे प्रकार जाणूनबुजून होत असल्याचा दावा केला आहे.
वाढलेल्या जागांमुळे पालिकेच्या सत्तेमध्ये महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरलेल्या दिव्याकडे सर्वच राजकीय पक्षांनी आपले लक्ष केंद्रित केले असून यामध्ये मनसे आघाडीवर आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी जाहीर सभा घेऊन येथील अनधिकृत बांधकामांच्या मुद्यावरून सत्ताधारी शिवसेनेवर सडकून टीका केली होती. आता याच मुद्यावरून पूर्वी मनसेच्या नगरसेविका असणाऱ्या सुनीता मुंडे यांचे पती गणेश मुंडे यांची एक वादग्रस्त चित्रफीत मनसेच्याच पदाधिकाऱ्यांनी उघड केली आहे.
ठाण्याचे मनसेचे संपर्कप्रमुख अभिजित पानसे आणि शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही चित्रफीत सादर केली. त्यामध्ये अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्यासाठी मुंडे हे समोरच्या व्यक्तीकडून पैसे मागत असल्याचे संभाषण ऐकू येत आहे. निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतरची ही चित्रफीत असून समोरची व्यक्ती कोण आहे, नेमका हा काय प्रकार आहे, याचा खुलासा लवकरच होईल, असा दावा जाधव यांनी केला. (प्रतिनिधी)
शिवसेनाच न्याय देईल असा विश्वास : मुंडे
मुंडे यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले असून हा सर्व बनाव असल्याचे सांगितले. पाच वर्षे नगरसेवकपदाची यशस्वी वाटचाल आपण केली असून हा केवळ आपल्याला बदनाम करण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्याकडूनच अनेक जण मदत घेऊन जात असतात. मनसेमध्ये असताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नाही. शिवसेनाच खरा न्याय देईल, या आशेने शिवसेनेमध्ये प्रवेश केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.