रुग्णालयाला जागा देण्यावरून पडली वादाची ठिणगी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 11:50 PM2020-12-08T23:50:59+5:302020-12-08T23:52:29+5:30
Ambernath News : गेली अनेक वर्षे ही जागा स्थानिकांनी संरक्षित ठेवली आहे. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमाची जागा सोडून रुग्णालय उभारण्याची मागणी जोर धरत आहे.
अंबरनाथ - सूर्योदय सोसायटीमधील मोकळ्या राखीव भूखंडावर सरकारी रुग्णालय बांधण्याचे प्रयत्न सरकार दरबारी सुरू आहेत. रुग्णालयाला विरोध नाही मात्र गेल्या अनेक वर्षांचा त्या ठिकाणचा सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम झाले नाही, तर रुग्णालयाला नागरिकांचा विरोध कायम राहील. प्रसंगी जनआंदोलनाचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. गेली अनेक वर्षे ही जागा स्थानिकांनी संरक्षित ठेवली आहे. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमाची जागा सोडून रुग्णालय उभारण्याची मागणी जोर धरत आहे.
कोरोनाच्या काळात रुग्णालयांची कमतरता जाणवू लागल्याने अंबरनाथच्या पूर्व भागातील सूर्योदय सोसायटीचा ११२ हा राखीव भूखंड रुग्णालय बांधण्यासाठी नगरपालिकेला ताबडतोब हस्तांतरित करण्याबाबत तहसीलदारांनी सोसायटीला सांगितले. सरकारच्या निर्णयानंतर कानसई विभागातील नागरिकांची नुकतीच बैठक झाली.
माजी नगरसेवक कुणाल भोईर, माजी नगरसेविका अपर्णा भोईर, विजय इंगळे, जगदीश हडप, एकनाथ चौधरी, गिरीश सोमणी, कानसई गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष भागवत खैरनार आदी उपस्थित होते. मैदान बचाव संघर्ष समितीची या बैठकीत स्थापना करण्यात आली.
कानसई येथील राखीव मोकळ्या भूखंडावर सुमारे ५२ वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत आहे. गणेशोत्सवात अरुण नलावडे, अविनाश खर्शीकर, भाऊ कदम आदी दिग्गज कलावंतांसह शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. अमोल कोल्हे यांची या मैदानात व्याख्याने झाली आहेत. याशिवाय रणजीपटू वसंत धानिपकर यांनी विनामूल्य प्रशिक्षण दिले. त्याचबरोबर मैदानात क्रिकेटच्या अनेक स्पर्धाही झाल्या. गेल्या काही वर्षांपासून नवरात्रौत्सव याच मैदानात जल्लोषात साजरा होत आहे.
विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणारी कानसईची टेकडी स्थानिक नागरिकांची जान आणि शान आहे. अनेक कलावंतांनी कलेला याच मैदानातून सुरुवात केली. रुग्णालयाला विरोध नाही, ते अन्यत्र करावे. मात्र मैदान निर्माण करणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे सरकारने त्याची दखल घ्यावी.
- विशाखा सुभेदार, अभिनेत्री
मुलांना खेळण्यासाठी आणि सांस्कृतिक कला सादर करण्यासाठी स्थानिक कलाकारांना व्यासपीठ असावे. या मुद्यावर व्यापक विचार करण्याची गरज आहे. वाद टाळून निर्णयाचा फेरविचार व्हावा.
- निरंजन कुलकर्णी, अभिनेता
रुग्णालये होणे ही काळाची गरज आहे, त्याचबरोबर मैदाने टिकली पाहिजेत, सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे. कानसई मैदानाविषयी नागरिकांचे अतूट नाते आहे. स्थानिक कलावंतांच्या कलागुणांना मैदानात वाव मिळाला आहे. यापुढेही मैदान तसेच राहावे. उर्वरित जागेत रुग्णालय व्हावे.
- कुणाल भोईर,
माजी नगरसेवक