बेकायदा इमारतीवरील कारवाई वादग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:49 AM2021-09-07T04:49:22+5:302021-09-07T04:49:22+5:30
कल्याण : दावडी येथील सहा मजली बेकायदा इमारतीवर कारवाई न करण्यासाठी आपल्याकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप बिल्डरने केली आहे. ...
कल्याण : दावडी येथील सहा मजली बेकायदा इमारतीवर कारवाई न करण्यासाठी आपल्याकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप बिल्डरने केली आहे. त्यामुळे ही कारवाई वादात सापडली आहे. या प्रकरणातील बिल्डर आणि अधिकाऱ्यांच्या हॉटेलमधील भेटीचा सीसीटीव्ही फुटेज उघडकीस आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दोषींविरोधात कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
दावडीतील डीपी रस्त्याच्या परिसरात सहा मजली बेकायदा इमारतीवर मनपा प्रशासनाने चार दिवसांपूर्वी कारवाई केली. इमारतीचे बिल्डर मुन्ना सिंग यांनी आरोप केला आहे की, इमारतीवर कारवाई न करण्यासाठी अधिकाऱ्यांनी आपल्याकडून लाखो रुपये उकळले आहेत. कारवाईपूर्वी अधिकारी अनंत कदम आणि दीपक शिंदे यांची एका हॉटेलमध्ये बैठक झाली. या अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या नावानेही पैसे घेतले आहेत. पैसे घेऊनही इमारतीवर कारवाई केली आहे.
बिल्डरने केलेल्या आरोपांबाबत सूर्यवंशी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, या प्रकरणाची तक्रार माझ्याकडे प्राप्त झालेली नाही. मात्र, हा प्रकार गंभीर असून, त्याची चौकशी करून दोषींच्या विरोधात कारवाई केली जाईल. दरम्यान, या घटनेनंतर मनपाचे बेकायदा बांधकामांच्या विरोधात कारवाई करणारे खाते पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
-----------------------------------------