गुणपत्रिकेवरील ‘कोविड-१९’ उल्लेखामुळे वादगुणपत्रिकेवरील ‘कोविड-१९’ उल्लेखामुळे वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 01:43 AM2020-08-01T01:43:19+5:302020-08-01T01:43:35+5:30
सुपेह विद्यालयातील प्रकार : पालकमंत्र्यांच्या निर्देशांना जिल्ह्यातील शाळांकडून हरताळ
लोकमत न्यूज नेटवर्क
बोर्डी : कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘कोविड-१९’ असा केलेला उल्लेख वगळून नवीन गुणपत्रिका वितरित करण्याबाबत निर्देश देताना कृषीमंत्री दादा भुसे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. याला पंधरवडाही उलटलेला नसताना डहाणू तालुक्यातील बोर्डीच्या सुनाबाई पेस्तनजी हकीमजी विद्यालयाने (सुपेह) नववी इयत्तेच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘कोविड-१९ पॅनडेमिक सिच्युएशन’ असा उल्लेख केल्याने पुन्हा वादाला तोंड फुटले आहे.
कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला आहे. डहाणू तालुक्यातील बोर्डी येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सुनाबाई पेस्तनजी हकीमजी विद्यालयाने इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेचे वाटप केले असून त्यावर ‘कोविड-१९ पॅनडेमिक सिच्युएशन’ असा उल्लेख केला आहे. राज्यातील कृषी विद्यापीठातील बी.एस्सी.च्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय सत्र विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर प्रमोटेड कोविड-१९ असा उल्लेख आढळल्यानंतर वाद निर्माण झाला होता. हे प्रकरण प्रसारमाध्यमांनी लावून धरल्यानंतर गुणपत्रिकेवर कोरोनाचा उल्लेख करण्याचा निर्णय कोणी घेतला, याची चौकशी करण्याचे निर्देश कृषीमंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेला दिले होते. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याची घोषणा भुसे यांनी केली होती. त्यानंतर, गुणपत्रिकेवरचा कोविड-१९ उल्लेख वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्यभर गाजलेल्या या प्रकाराला पंधरवडाही उलटला नसताना पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील बोर्डी येथील सुपेह विद्यालयात असाच प्रकार उघडकीस आला आहे. शाळेने गुणपत्रिका दिल्यानंतर काही पालकांना ही बाब खटकल्यानंतर चर्चेला तोंड फुटले. दरम्यान, कृषीमंत्री दादा भुसे हे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री असून या जिल्ह्यातच त्यांचे निर्देश डावलल्याची चर्चा सुरू आहे.
असा उल्लेख नियमबाह्य!
गुणपत्रिकेवर कोविड-१९ या उल्लेखाबाबत पालघर जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, असा उल्लेख करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी म्हटले. शाळांनी गुणपत्रिकेवर कोविड-१९ असा उल्लेख करू नये. ते नियमबाह्य असल्याचेही ते म्हणाले.
...तर या आदिवासी जिल्ह्यातील विद्यार्थी आणि पालकांवर याचा होणारा परिणाम पाहता प्रशासन कोणता निर्णय घेते तसेच पालकमंत्री कोणती भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे बनले आहे.