आयुक्तांच्या खुर्चीत माजी आमदार बसले अन् वादाला तोंड फुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 12:34 AM2019-11-21T00:34:47+5:302019-11-21T00:35:11+5:30
महापौरांची सारवासारव; बैठकांकरिता आम्हालाही दालन देण्याची मागणी
मीरा रोड : महापालिका आयुक्तांच्या दालनात महापौरांसह माजी आमदारांनी घेतलेल्या बैठकीवर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली असून शिवसेना, काँग्रेस, मनसे, बविआ, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी कारवाई करा, अशी मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी आयुक्त दालनात बोलावलेल्या बैठकीला माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी हजेरी लावून स्वत:च बैठकीचे संचालन केले. सोशल मीडियावर या विषयाची चर्चा रंगली असून अन्य पक्षांच्या नेत्यांनीही आम्हाला बैठकीकरिता आयुक्त दालन उपलब्ध करून देण्याची खोचक मागणी केली आहे.
मंगळवारी आयुक्तांचा नागरिकांना भेटण्याचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. परंतु, आयुक्त बालाजी खतगावकर हे कामानिमित्त बाहेर असल्याने सहायक आयुक्त मृदुला अंडे यांनी लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. आयुक्त दालनात असलेल्या बैठक कक्षात महापौर डिम्पल मेहता व माजी आ. नरेंद्र मेहता यांनी अन्य नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसह मुर्धा ते मोर्वा भागातील प्रतिनिधींची बैठक घेतली. रस्ता रुंदीकरणामुळे गावातील जुनी घरे बाधित होणार असल्याने स्थानिकांनी रविवारी गावात बैठक घेतल्यावर सोमवारी आ. गीता जैन यांची भेट घेतली होती. त्याचबाबत माजी आमदारांनी मंगळवारी बैठक घेतली. आयुक्तांच्या दालनात आयुक्त बसतात तेथे बसून मेहता यांनी घेतलेल्या बैठकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर त्याचे पडसाद उमटले.
महापौर डिम्पल मेहता म्हणाल्या की, आयुक्तांना या बैठकीची पूर्वकल्पना दिली होती. ते स्वत: बैठकीला हजर राहणार होते. पण, त्यांना पूर्वनियोजित कामामुळे बैठकीला उपस्थित राहता आले नाही. आपल्या महापौर दालनाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असल्याने आयुक्तांच्या दालनात बैठक घेतली. मात्र, माजी आमदार आयुक्तांच्या आसनावर बसल्याचा प्रचार कुहेतूने करून बदनामीचा प्रयत्न काही लोक करत आहेत, असा आरोप महापौरांनी केला.
माजी नगरसेवक रोहित सुवर्णा, काँग्रेसचे प्रवक्ते प्रकाश नागणे, बविआचे निलेश साहू, मनसेचे सचिन पोपळे यांनी आयुक्तांना लेखी तक्रार देऊन मेहतांवर कारवाईची मागणी केली आहे. तसेच आयुक्तांनी त्यांचे दालन आम्हालाही जनहितासाठी बैठक घेण्यास उपलब्ध करून द्यावे, असे म्हटले आहे.
विशेष खोली कशाला?
महापौर मेहता सध्या उपमहापौरांच्या दालनात बसत असून तेथे तीन मोठ्या खोल्या आहेत. महापौरांना जनतेची गाºहाणी ऐकायची तर विशेष बैठकीची खोली कशाला हवी, असा सवाल अन्य नेत्यांनी केला आहे. महापौरांच्या आडून माजी आमदार आपला कारभार चालवण्यासाठी तर हा आटापिटा करीत नाहीत ना, असा आरोप त्यांनी केला आहे.