गुन्हेगारांच्या प्रवेशावरून उडाली वादाची ठिणगी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 12:31 AM2019-07-22T00:31:43+5:302019-07-22T00:32:21+5:30
कलानी, आयलानी समोरासमोर : निवडणुकीपूर्वी वातावरण तापले
उल्हासनगर : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वी कुमार आयलानी व ओमी कलानी यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना पक्षात प्रवेश दिल्याच्या निषेधार्थ सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. हेच का गुन्हेगारीमुक्त उल्हासनगर, असा प्रश्नही करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी शहरातील राजकीय वातावरण तापायला लागले असून पुन्हा एकदा आयलानी-कलानी आमने-सामने उभे ठाकले आहेत. गेल्या आठवड्यात आमदार ज्योती कलानी, महापौर पंचम कलानी व ओमी कलानी यांनी एकत्र येत कलानी समर्थकांचा मेळावा घेतला. कलानी यांच्या मेळाव्याला जुगाराच्या अड्ड्यातील एका फरारी आरोपीसह अनेक गुन्हेगारी वृत्तीचे तरुण उपस्थित होते. तर, भाजपने शनिवारी घेतलेल्या जाहीर प्रवेश कार्यक्रमात तडीपारीची कारवाई झालेल्या एका गुंडासह वादग्रस्तांना यावेळी प्रवेश देण्यात आला. याप्रकरणी कलानी-आयलानी वादात सापडले असून गुन्हेगारीमुक्त उल्हासनगर हेच का, असे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
कलानी कुटुंबाने शक्तिप्रदर्शन करत घेतलेल्या मेळाव्यात कलानी कुटुंबापैकी एकजण विधानसभा निवडणुकीचा उमेदवार असल्याचे यावेळी ज्योती कलानी यांनी जाहीर केले होते. वास्तविक, पंचम कलानी भाजपच्या तिकिटावर निवडून येऊन महापौर बनल्या आहेत. तर, ज्योती कलानी राष्ट्रवादी पक्षाच्या आमदार आहेत. ओमी कलानी यांनी ओमी टीमची स्थापना करून भाजपसोबत आघाडी करून पालिका सत्तेत आहेत. तर, भाजप-शिवसेनेची युती होऊन कुमार आयलानी विधानसभेचे प्रबळ दावेदार आहेत.
कलानी कुटुंब भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे संकेत कलानी समर्थकांनी दिल्याने, निष्ठावंत भाजप पदाधिकारी व कुमार आयलानी गोटात खळबळ उडाली आहे. यातूनच कलानी व आयलानी आमने-सामने आल्याचे चित्र निर्माण झाले.
शहरात विकासकामांच्या नावाने बोंब असताना एकमेकांवर चिखलफेक करून राजकारण तापवले जात आहे. विधानसभा निवडणूक जशी जवळ येईल तसे शहरातील वातावरण अधिक गंभीर होईल असे भाकित राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
विधानसभेसाठी कुमार आयलानी तसेच कलानी कुटुंब तयारीला लागले असून आपल्याला तिकीट मिळावे यासाठी जोरदार हालचाली दोघांकडूनही सध्या सुरू आहे. मूळात ओमी कलानी यांच्यासोबत भाजपने जाऊ नये अशी आयलानी यांची भूमिका होती. मात्र शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने ओमी टीमशी हातमिळवणी केली. मात्र महापौरपदावरून भाजपने ओमी टीमला चांगलेच जेरीस आणले होते. तेव्हा हा वाद अगदी मुख्यमंत्र्यांच्या दारी गेला होता. त्यामुळे भाजप आणि ओमी टीममध्ये सख्य नाही हे सतत दिसते.
दरम्यान, आमदार ज्योती कलानी यांनी उल्हासनगरमधील गुन्हेगारीवर विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. शहर गुन्हेगारीमुक्त करणार अशा वल्गना केल्या होत्या. प्रत्यक्षात ओमी टीमचेच अनेकजण विविध गुन्ह्यांत सापडत असल्याने हेच का गुन्हेगारीमुक्त शहर असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत गंगोत्री यांनीही गुन्हेगारांना प्रवेश दिल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.
कलानी कुटुंब भाजपत जाणार का?
महापालिकेतील सत्ता शिवसेनेशिवाय टिकवण्यासाठी भाजपला ओमी कलानी यांच्यासह साई पक्षाचा पाठिंबा हवा आहे. तसेच उल्हासनगर मतदारसंघ भाजपच्या कोट्यात येत असून युती झाल्यास भाजपचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. अशावेळी कलानी वर्चस्व व आमदारकी टिकवण्यासाठी कलानी कुटुंब भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले असून आमदारकी व कलानी वर्चस्व टिकविण्यासाठी काहीही होऊ शकते.