शहापुरातील नैसर्गिक नाल्यांवर बिल्डरांची संक्रांत
By admin | Published: July 27, 2015 02:53 AM2015-07-27T02:53:52+5:302015-07-27T02:53:52+5:30
तालुक्याचे मुख्यालय असलेले व शहापूर, गोठेघर, वाफे, चेरपोली, कळंभे ग्रामपंचायतींनी एकत्रित बनलेल्या शहापूर शहरातील नैसर्गिक
भरत उबाळे, शहापूर
तालुक्याचे मुख्यालय असलेले व शहापूर, गोठेघर, वाफे, चेरपोली, कळंभे ग्रामपंचायतींनी एकत्रित बनलेल्या शहापूर शहरातील नैसर्गिक नाल्यांवर बिल्डरांची संक्रांत ओढवली असून प्रशासनाने नालेसफाईलाच येथे मूठमाती दिल्याने शहरातील नाल्यांची गटारगंगा तुंबलेलीच राहिली आहे. परंपरागत नैसर्गिक नाल्यांवर बांधकाम व्यवसायातील बिल्डरांनी इमारती उभ्या करून नाल्यांचे गळेच घोटले आहेत.
काही ठिकाणी भराव टाकून पूर्णपणे बुजविलेले नाले तेथील रहिवाशांनी निदर्शनास आणूनदेखील प्रशासनाने कारवाई केलेली नाही. शहरातील सांडपाण्याचा व पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याचा सोयीस्कर मार्गच त्यामुळे रोखला गेला आहे. चेरपोली-बामणे ग्रामपंचायत हद्दीत राहुलनगर, यमुनानगर, परांजपेनगर, पॉवर हाऊस व शहापूर ग्रामपंचायत हद्दीत कल्पतरू कॉम्प्लेक्स, तावडेनगर, गोणेनगर येथे बेसुमार सुरू असलेल्या बांधकामांनी निसर्गनिर्मित नाल्यांवर गंडांतर आणले आहे. हीच स्थिती वाफे, गोठेघर, कळंभे, सावरोली, बोरशेती, आसनगाव ग्रामपंचायतींच्या हद्दीत आहे.
पर्जन्य हंगामाच्या नावाखाली तहसीलदार कार्यालयाकडून एकीकडे आपत्ती व्यवस्थापनाचा बागुलबुवा उभा केला जात असताना दुसरीकडे कोरड्या दुष्काळाच्या नावाने त्यांचे आपत्ती व्यवस्थापन पूर्णपणे सुस्तावले आहे.
तालुक्याचा व नवनिर्मित शहापूर नगरपंचायतीचा कारभार तहसीलदारच पाहत आहेत. त्यांच्या नेहमीच्या दुर्लक्षामुळे निसर्गनिर्मित नाल्यांवरील बेकायदा बांधकामांना एक प्रकारे अभय मिळाले असून शहराचा पर्यावरणीय समतोल राखणारे उरलेसुरले निसर्गनिर्मित नाले संपुष्टात येण्याची भीती आहे. याबाबत तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (वार्ताहर)