श्री गणेश मंदिर संस्थान,डोंबिवली करणार छत्रपती शिवाजी उद्यानाचा कायापालट
By अनिकेत घमंडी | Published: May 31, 2018 05:43 PM2018-05-31T17:43:02+5:302018-05-31T17:47:34+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने श्री गणेश मंदिर संस्थानाने पुढाकार घेत आधी महापालिकेचे अत्रे ग्रंथालय आणि आता पूर्वेकडील नेहरु रोडवरील छत्रपती शिवाजी उद्यानाच्या देखभालीची जबाबदारी घेतली आहे.
डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने श्री गणेश मंदिर संस्थानाने पुढाकार घेत आधी महापालिकेचे अत्रे ग्रंथालय आणि आता पूर्वेकडील नेहरु रोडवरील छत्रपती शिवाजी उद्यानाच्या देखभालीची जबाबदारी घेतली आहे. महापालिकेने संस्थानाला ५ वर्षांसाठी त्या उद्यान देखभालीची जबाबदारी दिली असून त्याचा दस-या पर्यंत कायापालट करण्याचा मानस अध्यक्ष राहुल दामले आणि विश्वस्त प्रविण दुधे यांनी व्यक्त केला. मोराच्या गाडीसाठी अबालवृद्घांमध्ये प्रसिद्ध असलेली बागेचे काही महिन्यात रुपडे पालटणार आहे.
त्या माध्यमातून सर्वप्रथम बागेचे गर्दुल्ले आणि दारुड्यांसह उपद्रवींपासून संरक्षण व्हावे यासाठी रेल्वे रुळांच्या दिशेकडील संरक्षक भिंतीची डागडूजी तात्काळ हाती घेण्यात आली आहे. त्या भिंतीची उंची वाढवून त्यावरुन कोणी येणार नाही, जाणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. पहिल्या पावसाच्या शिडकाव्याआधी ते काम पूर्ण करण्यासाठी जोर लावण्यात येत आहे. दामले आणि दुधे म्हणाले की, पाल्यांसह पालकांनाही मनोरंजनासाठी एकही जागा शहरात नाही, ती या माध्यमाने देण्याचा संस्थानाचा मानस असून एक सुसज्ज बाग निर्माण करण्याचा प्रयत्न असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सर्व बाबींसाठी लाखोंचा निधी खर्च करण्यात येणार असून सर्वसामान्यांच्या गंगाजळीतून जमवलेल्या पैशांचा विनियोग करुन एक चांगल्या दर्जाची करमणूक वास्तू निश्चित निर्माण करणार असल्याचा विश्वास दामलेंनी व्यक्त केला. साधारणपणे दस-यापर्यंत ते दिवाळीच्या आत उद्यानामध्ये अमुलाग्र बदल करण्यात येणार आहेत.
पावसाच्या दिवसांमध्ये अत्याधूनिक पद्धतीने हिरवळ, झाडांची लागवड करुन बाग चांगल्या प्रकारे सुशोभित करण्याचे नियोजन सुरु आहे. त्याच कालावधीत अद्ययावत खेळणी बसवण्यात येणार आहेत. त्यासोबतच स्वच्छतेसाठीही विशेष नियोजन करण्याचा संस्थानाचा मानस आहे. सध्या बागेच्या जागेतील अनावश्यक बाबींची तांत्रिक आवश्यकता नसेल तर ते काढुन जागा मोकळी करणे, अधिकाधिक जागेत नागरिकांसाठी मनोरंजन, चिमुरड्यांना विरंगुळा देण्याचा प्रयत्न असेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या आधी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडे त्या उद्यानाच्या देखभालीची जबाबदारी होती.
या आधी श्री गणेश मंदिर संस्थानाने बागे लगतच्या जागेतच ज्येष्ठ नागरिक कट्टयाची डागडुजी करत त्याचे सुशोभिकरण केले. आजमितीस त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ शेकडो ज्येष्ठ नागरिक विरंगुळयासह व्यायामासाठी येतात. तेथे ओपन जीम आणि चांगल्या दर्जाची बाकडी टाकण्यात आलेली आहेत. स्वच्छता देखिल आवर्जून ठेवली जाते. त्या पाठोपाठ संस्थानाने महापालिकेचे अत्रे गं्रथालय देखिल घेतले असून आता त्या ठिकाणीही सभासद संख्या उल्लेखनिय असून त्या वाचनालयाचा आलेख देखिल चढता ठेवण्यात संस्थानाला यश आले आहे. त्याचाच पुढचा टप्पा म्हणुन आता लहानग्यांसह त्यांच्या पाल्यांसाठी ही बाग अद्ययावत करण्यात येणार आहे.