ठाण्यात कुकरचा स्फोट; सुदैवाने कोणालाही दुखापत नाही
By अजित मांडके | Published: November 9, 2023 05:59 PM2023-11-09T17:59:21+5:302023-11-09T18:00:09+5:30
किचनमध्ये कुकरचा स्फोट झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी धाव घेतली.
ठाणे : हिरानंदानी इस्टेट, या ठिकाणच्या तळ अधिक १४ मजली प्लॅटिनम हेरिटेज बिल्डिंग या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या शॉप नंबर १५ मधील मे. तमीळन टिफीन शॉपमध्ये किचनमध्ये जेवण करताना, गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ६० लिटरच्या कुकरचा स्फोट झाला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
सदर गाळ्याचे मालक हितेश पटेल यांनी सुब्रमण्यम अय्यर यांना तो भाड्याने दिले असून तेथे मे. तमीळन टिफीन शॉप सुरू आहे. त्या किचनमध्ये कुकरचा स्फोट झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी धाव घेतली. ज्यावेळी हा स्फोट झाला त्यावेळी दोन्ही कर्मचारी किचनच्या बाहेर होते. त्यामुळे या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी, किचनमधील पीओपी सीलिंग, एक्झॉस फॅन चिमणी, दरवाजा व किचन मधील इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. तर सदर शॉपला सुरक्षेच्या कारणास्तव धोकापट्टी लावून बंद करण्यात आले आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.