कूचकामी रस्तारूंदीकरण, भार्इंदर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 01:07 AM2019-06-26T01:07:25+5:302019-06-26T01:07:41+5:30

मीरा-भार्इंदर महापालिका व लोकप्रतिनिधींनी गाजावाजा करत रूंद केलेला मुन्शी कम्पाऊंडमधील रस्ता व्यावसायिक व खाजगी वाहनांसह भंगार साहित्य आदींच्या अतिक्रमण विळख्यात सापडला आहे.

 Cooperative Road Rule, Irrigation of Bhinder Municipal Administration | कूचकामी रस्तारूंदीकरण, भार्इंदर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

कूचकामी रस्तारूंदीकरण, भार्इंदर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

Next

मीरा रोड  - मीरा-भार्इंदर महापालिका व लोकप्रतिनिधींनी गाजावाजा करत रूंद केलेला मुन्शी कम्पाऊंडमधील रस्ता व्यावसायिक व खाजगी वाहनांसह भंगार साहित्य आदींच्या अतिक्रमण विळख्यात सापडला आहे. घरे तोडून पालिकेने रूंद केलेला हा रस्ता प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे कूचकामी ठरला आहे. दोन्ही बाजूला बेकायदा बांधकामांचे इमले उभे राहिले आहेत.
काशिमीरा भागातील मुन्शी कम्पाऊंड झोपडपट्टी ही अरूंद रस्ते व गल्ल्यांसाठी तसेच विविध प्रकारच्या भंगार गोदाम आणि व्यवसायासाठी ओळखली जाते तेवढीच अनधिकृत बांधकामांसाठीही प्रसिद्ध आहे. पालिका प्रशासन व लोकप्रतनिधींच्या अर्थपूर्ण संगनमताने अनधिकृत बांधकामांचे इमले फोफावल्याने येथे चांगलीच दाटीवाटी झाली आहे.
येथील रस्ता हा जेमतेम २० फुटाचा असल्याने तो ४० फूट रूंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यासाठी नागरिकांची राहती घरे व दुकाने तोडली. ज्यांची घरे व दुकाने गेली त्यांना पालिका आणि लोकप्रतिनिधींच्या संगनमताने वाटेल तशी वाढीव बेकायदा बांधकामे बांधण्यास मोकळीक देण्यात आली.
पालिकेने सुमारे ४० फूट इतका रस्ता रूंद केल्यानंतर येथील रहिवाशांना दिलासा मिळेल अशी आशा होती. परंतु आजूबाजूला बेकायदा बांधकामांचे इमले वाढण्यासह रस्त्यावरही भंगार - साहित्याचे अतिक्रमण झाले आहे. व्यावसायिक वापराची वाहने मोठ्या संख्येने उभी केली जातात. यामुळे ४० फूट रूंद केलेला रस्ता नागरिकांना वापरण्यासाठी मात्र जेमतेम १५ फूटच मिळत आहे. वाहतुकीलाही अडथळा होत आहे. यामुळे रहिवाशी मेटाकुटीला आले आहेत.
आमची राहती घरे आणि दुकाने रूंदीकरणासाठी तोडली. त्याची दुरुस्ती आणि बांधकामासाठी प्रत्येक रहिवाशाला काही लाखांचा भूर्दंड सहन करावा लागला.
हक्काची जागा गेली आणि काही लाखांचे नुकसान सहन करावे लागूनही रस्ता रुंदीकरणाचा फायदाच होत नसल्याचे रहिवाशी सांगतात. प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे तर बेकायदा बांधकामांना पाठीशी घालत आहेतच पण रस्त्यातील अतिक्रमणांवरही कारवाईस टाळाटाळ करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
या प्रकरणी अन्वर अली मंसुरी, गुरू घुट्याळ, अतिक सय्यद, अब्दुल हकीम शाह, निखील शिंदे, राजू देशपांडे, इरफान सिद्दीकी आदी रहिवाशांच्या शिष्टमंडळाने रॉयल सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आयुक्त बालाजी खतगावकर यांची भेट घेऊन अतिक्रमणाबाबत तक्रार केली.

... तर रूंदीकरण हवे कशाला?

आधी असलेला २० फुटाचा रस्ता बरा होता. आता रस्ता ४० फूट करूनही नागरिकांना वापरायला मात्र जेमतेम १५ फूटच मिळत असल्याचे आयुक्तांना सांगितले. आपत्कालिनवेळी अग्निशमन दलाची गाडी, रूग्णवाहिकाही आत येणार नाही अशी गंभीर स्थिती आहे.

रूंदीकरणासाठी घरे, दुकाने तोडून त्यांचे लाखोंचे नुकसान पालिकेने केले. पण जर रस्त्यावर अतिक्रमण होऊन कारवाई होत नसेल तर रूंदीकरण हवे तरी कशाला? असा सवाल रहिवाशांनी केला आहे. दरम्यान, आयुक्तांनी प्रभाग अधिकारी बोरसेंना त्वरित फोन करुन अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिल्याचे अनवर अली यांनी सांगितले.

Web Title:  Cooperative Road Rule, Irrigation of Bhinder Municipal Administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.