कोपर पूल अखेर वाहतुकीसाठी बंद, केडीएमसीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 12:06 AM2019-09-16T00:06:54+5:302019-09-16T00:07:04+5:30
वाहतूकबदलाची अधिसूचना जाहीर करीत, हा उड्डाणपूल रविवारी सायंकाळपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला.
डोंबिवली : कमकुवत झालेला कोपर रेल्वे उड्डाणपूल तातडीने बंद करा, असे पत्र कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी वाहतूक विभागाला पाठविल्यानंतर, वाहतूकबदलाची अधिसूचना जाहीर करीत, हा उड्डाणपूल रविवारी सायंकाळपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. केडीएमसी आणि रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाच्या अभावात पुलाच्या दुरुस्तीचे काम विलंबाने सुरू होणार असताना, पूल बंद करताना वाहतूक विभागाकडून करावयाचे नियोजनदेखील उशिराने झाल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि चौकांमध्ये कोंडी होऊन डोंबिवलीकर वेठीला धरले गेल्याचे पाहायला मिळाले.
कोपर उड्डाणपुलाबाबत रॅनकॉन कंपनीने दिलेल्या अहवालात पुलावरील वजन केडीएमसीने कमी केले असून आता रेल्वेनेही पुलाचे वजन कमी करण्यासाठी काही उपाययोजना केल्या तर तो पूल अजूनही तग धरू शकतो, असे म्हटले होते. यावर कोपरपुलाचा चेंडू रेल्वेच्या कोर्टात टाकल्याची चर्चा होती. परंतु, हा अहवाल आयआयटीने स्वीकारला नाही. अखेर, रेल्वेकडून सुरक्षा कायद्यांतर्गत महापालिकेला पत्र लिहिण्यात आले. त्यात तातडीने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात यावा, असे सांगण्यात आले. यावर महापालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांनी वाहतूक विभागाला पत्र लिहून पूल तत्काळ बंद करण्याची आणि अनुचित घटना घडल्यास वाहतूक पोलीस जबाबदार राहतील, असे स्पष्ट केले होते. अखेर, रविवारी सायंकाळी पुलाच्या दोन्ही बाजूंना लोखंडी बार टाकून वाहतूक विभागाकडून तो वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला.
दरम्यान, पूल बंद केल्याच्या पार्श्वभूमीवर दोन ते तीन दिवस आधी वाहतूकबदलाची अधिसूचना जाहीर होणे अपेक्षित होते. तसेच बहुतांश ठिकाणी दिशादर्शक फलकही लावले गेले नव्हते. त्यामुळे शहरातील आणि बाहेरून येणाऱ्या वाहनचालकांची पूल बंद झाल्यावर चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. पूर्वेकडील केळकर रोड, मानपाडा रोड, टिळक चौक या महत्त्वाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली होती. पश्चिमेकडील दीनदयाळ चौक, मच्छी मार्केट, फुले चौक येथेही वाहनचालकांना कोंडीला सामोरे जावे लागले. विशेष बाब म्हणजे, ज्या ठाकुर्ली उड्डाणपुलावरून वाहतूक वळवली, तेथील रस्ते अरुंद असल्याने त्याठिकाणीही वाहतुकीचा बोजवारा उडाला. या परिसरात समविषम पार्किंग, एकदिशा मार्ग तसेच नो-पार्किंग क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. त्याचीही पुसटशी कल्पना नसल्याने वाहनचालकांचा चांगलाच गोंधळ उडाला होता. काही ठिकाणी वादाचे प्रसंगही घडले. एकीकडे कल्याण पूर्व-पश्चिम जोडणाºया पत्रीपुलाचे काम संथगतीने सुरू असताना डोंबिवलीचा कोपर उड्डाणपूलही बंद झाल्याने वाहनचालक पुरते हैराण झाले असून कोंडी सोडवताना वाहतूक पोलीस आणि कर्मचाऱ्यांचीही कसरत झाली. शनिवारी आणि रविवारी डोंबिवली शहरात वाहतूककोंडीचे चित्र जागोजागी दिसते. यात कोपरपूल बंद झाल्याने वाहनचालकांची अवस्था बिकट झाली .
>मनसेचा केडीएमसीच्या अधिकाºयांना घेराव
कोपरपुलाचा पत्रीपुल होऊ देणार नाही. पुलाचे काम कधी पूर्ण होणार, ते सांगा. मगच, कोपरपूल कामासाठी बंद करा, असा जाब विचारत केडीएमसीचे प्रकल्प अभियंता तरुण जुनेजा यांना मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून कोपरपुलावर घेराव घालण्यात आला. मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम आणि महापालिकेतील मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी जुनेजा यांना अटकाव करीत कामाच्या निश्चित कालावधीची माहिती देण्यास सांगितले. वाहतूक सहायक पोलीस आयुक्त डी.बी. निघोट, डोंबिवली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतेज जाधव आणि रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आहिर घटनास्थळी होते. त्यावेळी दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यास १० महिन्यांचा कालावधी लागेल, असे जुनेजा यांनी सांगितले. यावर पूल कमकुवत झाल्यामुळे तो बंद करण्यासाठी आम्ही आडकाठी आणणार नाही. परंतु, हे काम सहा ते सात महिन्यांत पूर्ण झाले पाहिजे. नागरिकांना वेठीला धरू नका, अन्यथा मनसे खपवून घेणार नाही, असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला. पुलाचा आराखडा महापालिकेकडून बनविला जाणार असून मंजुरीसाठी आयआयटीकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर, पुढील कार्यवाही पार पडेल. साधारण, आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस कामाला सुरुवात होईल. पण, यात महावितरण आणि रेल्वेचेही सहकार्य वेळोवेळी मिळणे अपेक्षित असल्याचे जुनेजा यांनी सांगितले. यावेळी मनसेने महापालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही केली.