ठाण्यात तीन महिन्यात २३० नशाबाजांविरुद्ध ‘कोप्टा’ची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 10:32 PM2018-11-30T22:32:53+5:302018-11-30T22:37:50+5:30
शाळा तसेच महाविद्यालय परिसरात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि सेवन करणाऱ्या २३० जणांविरुद्ध ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कोप्टांतर्गत कारवाई केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे शहरातील विविध शाळा तसेच महाविद्यालय परिसरात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि सेवन करणा-या २३० जणांविरुद्ध ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कोप्टांतर्गत कारवाई केली आहे. महाविद्यालयीन तरुणांनी अमली पदार्थांचे सेवन करुन नये, यासाठीही शुक्रवारी जोशी बेडेकर महाविद्यालयात पोलिसांनी जनजागृती मोहीम राबविली.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील शाळा आणि महाविद्यालय परिसरात होणारी अमली पदार्थांच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात येऊन विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी गुन्हे आढावा बैठकीतून सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिका-यांना दिले आहेत. तसेच शाळा, कॉलेज परिसरात गस्त वाढवून अमली पदार्थ आणि गुटखा, तंबाखूजन्य पदार्थाची विक्र ी रोखण्याचे आदेशही अमली पदार्थ विरोधी पथकाला दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर अमली विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या पथकाने अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध कारवाईची मोहीम उघडली आहे. या मोहिमे अंतर्गत गेल्या तीन महिन्यात खैरनार यांच्या पथकाने विविध शाळा आणि कॉलेज परिसरात गस्त घालून २३० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल केलेल्या व्यक्ती अमली पदार्थ तसेच तंबाखूजन्य पदार्थाची विक्र ी तसेच सेवन करतांना आढळल्याने त्यांच्यावर कारवाई केल्याचे खैरनार यांनी सांगितले. कारवाईची ही मोहीम यापुढेही अधिक तीव्र करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
---------
जोशी बेडेकर महाविद्यालयात जनजागृती
अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पवार, उपायुक्त दिपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार आणि उपनिरीक्षक धर्मराज बांगर आदींच्या पथकाने ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयात अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम शुक्रवारी राबविली. अमली पदार्थामुळे होणारे दुष्परिणाम त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांसमोर विशद केले. या कार्यक्रमामध्ये सुमारे २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि सहपोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या संकल्पनेतून ठाण्यातील शाळा आणि महाविद्यालय परिसरामध्ये सध्या पोलिसांतर्फे ही अमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यात येत आहे.