कोपर पुलाचे काम तीन महिन्यांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 01:32 AM2019-09-18T01:32:49+5:302019-09-18T01:32:54+5:30
डोंबिवलीचा कोपर पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने नागरिक आणि वाहनचालक वाहतूककोंडीच्या चक्रात अडकले आहेत.
कल्याण : डोंबिवलीचा कोपर पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने नागरिक आणि वाहनचालक वाहतूककोंडीच्या चक्रात अडकले आहेत. या पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि महापौर विनीता राणे यांनी रेल्वेच्या डीआरएमसोबत चर्चा केली होती. या चर्चेअंती पुलाचे काम तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा दावा स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी केला आहे. तसेच, हा पूल पूर्णत: तोडावा लागेल, असा गैरसमज पसरवला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोपर पूल रविवारपासून वाहतुकीसाठी बंद केला आहे. पर्यायी वाहतूक ठाकुर्ली पुलावरून वळवली आहे. हा पूल अरुंद असल्याने वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. रेल्वेसोबत झालेल्या चर्चेची माहिती देण्यासाठी महापौर राणे यांच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
म्हात्रे म्हणाले की, पूल पूर्णपणे तोडावा लागणार असा गैरसमज पसरविला जात आहे. प्रत्यक्षात पुलावरचा स्लॅब तोडून तेथे नवा स्लॅब टाकायचा आहे. हे काम तीन महिन्यांत होण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला जाणार आहे. पुलावरील महावितरणच्या वीज वाहिन्या हटवण्यासाठी जो खर्च अपेक्षित आहे, तो जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केला जाणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत राज्यमंत्र्याची बैठक झाली होती. त्याचा अहवाल म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सादर करत वीज वाहिन्या हटवण्याचा खर्च जिल्हाधिकारी कधी महापालिकेस देणार, असा सवाल केला. वीज वाहिन्या हटवल्यानंतर प्रत्यक्ष कामाला तातडीने सुरुवात होईल. मात्र, वीज वाहिन्या हटवण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेला नाही. महावितरण हे काम करणार नसेल तर त्यांच्याविरोधात कठोर पावले उचणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. राज्यमंत्र्यांनी रस्त्यासाठी ४०० कोटी मंजूर केले आहेत. त्यापैकी काही कोटी या कामासाठी वळवले जावेत. पुलासाठी आठ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पुलाचे डिझाइन दहा दिवसांत अंतिम करण्यात येईल. निविदा प्रक्रिया न करताच हे काम केले जाणार आहे.
>‘ठाकुर्ली रेल्वे फाटक सुरू करा’
कल्याण : डोंबिवलीचा कोपर रेल्वे उड्डाणपूल रविवारी सायंकाळपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, रेल्वेने पर्यायी वाहतुकीचा पर्याय दिलेला नाही. त्यांनी ही जबाबदारी महापालिका व वाहतूक पोलिसांवर ढकलली आहे. हा पूल बंद करण्याच्या हालचाली चार महिन्यांपूर्वीच सुरू झाल्या. त्याचवेळी ठाकुर्ली येथील बंद केलेले रेल्वे फटाक पुन्हा सुरू करण्याची मागणी शिवसेनेने रेल्वे प्रशासनाकडे केली होती. मात्र, रेल्वेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे, याकडे शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे. कोपर उड्डाण पुलाच्या कामासंदर्भात रेल्वेने नियोजन केलेले नाही. रेल्वेने कल्याण-डोंबिवली महापालिकेस नोटीस पाठवून आपण कसे नामानिराळे आहोत, याची प्रचिती दिली आहे. रेल्वे पुलांच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापलिकेने रेल्वेला आतापर्यंत चार कोटी ९५ लाख रुपये दिले आहेत. मग रेल्वे कसली देखभाल दुरुस्ती केली, असा सवाल शिवसेनेने केला होता. कोपर पूल बंद केल्याने वाहतूक आता ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपुलावरून वळविली आहे. मात्र हा पूल वाहतुकीसाठी अरुंद आहे. डोंबिवली पश्चिमेतून पूर्वेला जाणाºया स्कूलबस व अन्य वाहने या पुलावरील वाहतूककोंडीत अडकण्याची भीती आहे. त्यामुळे येथील कोंडी टाळण्यासाठी रेल्वेने ठाकुर्ली येथील रेल्वे फाटक पुन्हा वाहतुकीसाठी खुले करावे. कोपर पुलाचे काम होईपर्यंत ही सुविधा द्यावी, असे मागणी शिवसेनेने केली होती. मात्र, रेल्वेने त्याचा विचार केलेला नाही. त्यामुळे हे फाटक खुले करावे, अशी मागणी आता म्हात्रे यांनी खा. डॉ. श्रीकांत शिंदे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
>दाव्याबाबत साशंकता : म्हात्रे यांनी तीन महिन्यात काम पूर्ण करण्याचा दावा केला असला तरी पुलाच्या कामाचे डिझाइन मंजूर होण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे हे काम तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा दावा कितपत खरा ठरणार, असा प्रश्न आहे. कारण, पत्री पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. पत्री पुलाचे काम डिसेंबर २०१८ मध्ये सुरू झाले. हे काम फेब्रुवारी २०२० मध्ये पूर्ण होणार आहे, असे राज्य रस्तेविकास महामंडळाने सांगितले.