भिवंडीत धोकादायक इमारतीच्या स्लॅबचा कोपरा कोसळला, सुदैवाने जीवितहानी टळली
By नितीन पंडित | Published: June 29, 2023 01:19 PM2023-06-29T13:19:28+5:302023-06-29T13:19:43+5:30
आयुक्तांनी इमारतीमधील विस्थापित होणाऱ्या नागरिकांची तात्पुरती निवास व्यवस्था पालिका सांस्कृतिक हॉलमध्ये करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
भिवंडी : शहरातील अजंटा कंपाउंड येथील एका धोकादायक इमारतीच्या छतावरील स्लॅबचा कोपरा कोसळल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे. सुदैवाने इमारतीमधील अनेक खोल्या रिकाम्या करून येथील विद्युत पुरवठा व पाणी पुरवठा खंडित केला होता. या इमारतीच्या ५२ पैकी ४८ खोल्या रिकाम्या होत्या. तर चार खोल्यांमध्ये नागरिक राहत होते.असलेल्या सात व्यक्तींना इमारतीतून बाहेर काढून इमारत सीलबंद करण्यात आली आहे.
अजंता कंपाउंड येथील मालमत्ता क्रमांक ५४८ नवीन गौरीपाडा मध्ये ही ४४ वर्ष जुनी इमारत असून धोकादायक असल्याने मनपा प्रशासनाने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच इमारतीचा पाणी व विज पुरवठा खंडित करून अनेक घरे रिकामी केली होती. परंतु त्यानंतर ही चार खोल्यांमध्ये काही नागरीक असल्याची माहिती दुर्घटने नंतर मिळताच घटनास्थळी मनपा अधिकारी,भोईवाडा पोलिस ,अग्निशामक दलाच्या जवानांसह घटनास्थळी दाखल होत तेथील इमारती मध्ये राहणाऱ्या सात नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले.
घटनास्थळी आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी भेट दिली. इमारत धोकादायक असल्याने पालिका अधिकारी कर्मचारी यांनी वेळेत ती रिकामी केली असल्याने सुदैवाने जीवितहानी झालेली नाही अशी माहिती देत आयुक्तांनी इमारतीमधील विस्थापित होणाऱ्या नागरिकांची तात्पुरती निवास व्यवस्था पालिका सांस्कृतिक हॉलमध्ये करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.