कोथिंबिरीची जुडी अवघ्या एक रुपयाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 03:19 AM2017-08-18T03:19:56+5:302017-08-18T03:19:58+5:30
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कोथिंबिरीचा भाव गडगडल्याने एका जुडीला रुपयाचा भाव मिळाला.
कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कोथिंबिरीचा भाव गडगडल्याने एका जुडीला रुपयाचा भाव मिळाला. त्यामुळे अनेक शेतकºयांनी रागाच्या भरात जुड्या फेकून दिल्या. काही शेतकºयांनी कल्याण स्टेशन परिसर गाठून पाचपाच रुपयांना जुड्या विकत कसाबसा खर्च भरून काढला. त्यामुळे कोथिंबीर खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे चित्र होते.
नगर, नाशिक, पुणे या भागांतून बाजार समितीत साधारणत: एक जुडी आठ ते १० रुपयांना विकली जात होती आणि किरकोळ बाजारात ती १५ ते २० रुपयांना विकली जाई. मात्र, घाऊक बाजारातील भाव गुरुवारी आवक वाढल्याने अचानकपणे रुपयावर आला. रुपयात जुडी विकून उत्पादन खर्च आणि वाहतुकीचा खर्चही निघणार नसल्याने ती फेकून दिलेली परवडली, असा विचार करत काही शेतकºयांनी ती फेकून दिली. तर, काहींनी ती फेकून देण्याऐवजी टेम्पो कल्याण, उल्हासनगर, विठ्ठलवाडी स्टेशन परिसरात नेले आणि एक जुडी पाच रुपयांना विकली. सध्या श्रावण सुरू असल्याने भाज्यांचे दर बºयापैकी चढे आहेत. तरीही, कोथिंबीर रुपयाने विकली गेल्याने शेतमालाच्या हमीभावाचा मुद्दा चर्चेत आला. उत्पादन खर्च, वाहतुकीचा खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी संतापले होते, तर व्यापाºयांनी मात्र आवक प्रचंड वाढल्याचे सांगत त्यामुळे भाव गडगडल्याचा मुद्दा मांडला. याविषयी बाजार समितीची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पतेतीची सुटी असल्याने ती मिळू शकली नाही.