केडीएमसी हद्दीत महिनाभरात १७३ मुलांना कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:39 AM2021-07-31T04:39:46+5:302021-07-31T04:39:46+5:30
मुरलीधर भवार लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी कल्याण-डोंबिवली मनपा प्रशासन सज्ज झाले आहे. या ...
मुरलीधर भवार
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी कल्याण-डोंबिवली मनपा प्रशासन सज्ज झाले आहे. या लाटेत लहान मुले जास्त बाधित होतील, असा अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने मनपाने तयारी सुरू केली आहे. दरम्यान, १ जुलै ते ३० जुलैदरम्यान मनपा हद्दीतील ० ते १२ वयोगटांतील १७३ मुलांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत ४५ ते ६० व त्यापेक्षा अधिक वयोगटांतील नागरिक बाधित झाले होते. तर, दुसऱ्या लाटेत १८ ते ४४ वयोगटांतील आणि सहव्याधी असलेल्यांना बाधा झाली होती. पहिल्या लाटेपेक्षा जास्त मृत्यू हे दुसऱ्या लाटेत झाले होते. आता दुसरी लाट ओसरत असून, सर्व व्यवहार खुले झाले आहेत. सर्वच ठिकाणी गर्दी वाढत असल्याने तिसरी लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाचे विविध व्हेरिएंट दुसऱ्या लाटेत दिसून आले. तिसऱ्या लाटेत हेच व्हेरिएंट लहान मुलांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिसरी लाट ओसरल्यावर शाळा खुल्या केल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे ते शाळेत जात नसली तरी त्यांचे पालक हे कामानिमित्त व दैनंदिन जीवनाश्यक वस्तू आणण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. परिणामी त्यांच्या करवी मुलांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे.
----------------------------------------------
ताप आला म्हणजे कोरोना असे नाही, पण...
ताप आला म्हणजे कोरोना असेलच असे नाही. ताप हे कोरोनाचे प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. ताप नेमका कोणता आहे, याची तपासणी केली पाहिजे. बालरोगतज्ज्ञांनी मुलांना ताप आल्यास त्यांच्यावर प्रथमोपचार करीत बसू नये. लक्षण ओळखून पालकांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला द्यावा. तापाऐवजी कोरोनाचे निदान झाल्यास त्यांच्यावर योग्य उपचार केले जावेत. निदान लवकर झाल्यास मुलांवर उपचार करणे सोपे होईल, असे म्हटले आहे.
---------------------
सर्दी, खोकला, तापाची साथ?
सध्या तापाबरोबर सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळत आहेत. मात्र पावसाळ्यात जलजन्य आजार उद्भवतात. त्यामुळे आलेला ताप कोरोनाचा की जलजन्य आजारातून आला आहे. तसेच तो व्हायरल फिव्हर आहे का, याची शहानिशा केली पाहिजे.
----------------------------------------------
बालकांसाठी कोविड केअर सेंटर
केडीएमसीतर्फे डोंबिवलीतील विभा कंपनीच्या इमारतीत कोविड सेंटर उभारले जात आहे. तेथे मुलांसाठी ८० बेडची सोय आहे. त्यामध्ये ४० आयसीयू आणि ४० ऑक्सिजनचे बेड असतील. तसेच मनपाच्या रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ असून, ते त्यांच्यावर उपचार करतील.
- डॉ. प्रतिभा पानपाटील, साथरोग नियंत्रण वैद्यकीय अधिकारी, केडीएमसी
--------------------------------------------
घाबरून नका, काळजी घ्या
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुले बाधित होतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे पालकांनी मुलांची विशेष काळजी घेतली पाहिजे. पालकांनी कामावरून अथवा बाहेरून घरी आल्यावर लगेच मुलांना जवळ घेऊ नये. प्रथम अंघोळ करून मगच त्यांच्या संपर्कात जावे. मुलांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास तातडीने मनपाच्या अथवा खासगी रुग्णालयात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोना चाचणी केली पाहिजे.
- डॉ. सोनाली पाटील, बालरोगतज्ज्ञ
----------------------------------------------
केडीएमसी हद्दीतील कोरोनाचे एकूण रुग्ण - एक लाख ३८ हजार ६७४
शून्य ते १२ वर्षांखालील रुग्ण -१७३ (१ ते ३० जुलै २०२१ दरम्यानचे)
----------------------------------------------