कुटुंबातील ३० जणांना कोरोना; गणेशोत्सवात एकत्र आल्याने झाली लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 12:23 AM2020-09-06T00:23:09+5:302020-09-06T00:23:54+5:30
कल्याण शहरातील घटना
कल्याण : पश्चिमेतील जोशीबागमधील एका इमारतीत राहणाऱ्या कुटुंबातील ३० जणांना कोरोनाची लागण झाल्याची बाब उघडकीस आली आहे. गणेशोत्सवात हे कुटुंब एकत्र आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची शक्यता केडीएमसीच्या आरोग्य विभागाने वर्तवली आहे.
जोशीबागेतील चार मजली इमारतीत एका व्यावसायिकाचे ४० जणांचे कुटुंब एकत्र राहते. या कुटुंबीयांनी दीड दिवसांचा गणपती बसविला होता. यावेळी उत्सवासाठी सगळे जमले होते. या कुटुंंबात सगळे जण एकत्र स्वयंपाक करतात. तसेच एकत्र जेवतात. गणेशोत्सवात कुटुंबातील एकाला कोरोनाची लक्षणे दिसली. त्याची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली. त्यामुळे ३३ जणांची चाचणी केली असता ३० जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी १३ जणांना मेट्रो तर, १७ जणांना ए अॅण्ड जी रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान, केडीएमसी हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. शुक्रवारपर्यंत रुग्णांची संख्या ३० हजार ५४० वर
पोहोचली आहे. सध्या तीन हजार २८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, उपचाराअंती २६ हजार ११२ रुग्ण बरे झाले आहेत. तर, कोरोनामुळे आतापर्यंत ६६५ जणांचा मृत्यू आहे.
नियम धाब्यावर : अनलॉक-४ मध्ये जिल्हाबंदी उठवण्यात आली आहे. सरकारी व खाजगी कार्यालयेही अधिक मनुष्यबळाने सुरू झाली आहेत. त्यामुळे वाहने रस्त्यावर येऊ लागल्याने ठिकठिकाणी कोंडी होत आहे. मात्र, अनेक जण मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचे दिसून आले.