कोरोनाबाधित विद्यार्थी गेले घरी, शोधासाठी प्रशासन दारोदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 05:33 AM2022-01-05T05:33:09+5:302022-01-05T05:33:21+5:30
डाेकेदुखी वाढली : चिंबीपाडा आश्रमशाळेतील बाधितांची संख्या ३० वर
- नितीन पंडित
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३० वर पोहाेचली आहे. कोरोनाची लागण झालेले २८ विद्यार्थी पालकांसोबत निघून गेल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यांना त्यांच्या गावातून शोधून काढून उपचार करण्यासाठी प्रशासनाने धडपड सुरू केली आहे.
सोमवारी ही घटना उघड झाल्यानंतर मंगळवारी सर्व शासकीय यंत्रणा चिंबीपाडा आश्रमशाळेत दाखल झाल्या आहेत. आदिवासी क्षेत्र विकास समितीचे अध्यक्ष विवेक पंडित, आदिवासी प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती अतिरिक्त गटविकास अधिकारी अविनाश मोहिते, तालुका आरोग्य अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक व श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्त्यांनी बाधित विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन विद्यार्थी व पालक यांची समजूत काढून उपचार करण्यासाठी प्रवृत्त करण्यास सुरुवात केली आहे. चिंबीपाडा प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा आश्रमशाळा या ठिकाणीच उपचार होणार असल्यास त्यांनी तयारी दर्शविली आहे. प्रशासन त्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात गुंतले आहे.
आश्रमशाळेतच गृहविलगीकरण कक्षात ठेवून उपचार करण्याची सूचना प्रशासनाला पंडित यांनी केली आहे.
पालकांनी घातला गाेंधळ
चिंबीपाडा आश्रमशाळेत एकूण ६०२ विद्यार्थ्यांपैकी ४७६ विद्यार्थी हजर होते. त्यापैकी १८७ विद्यार्थी वसतिगृहात वास्तव्यास आहेत. त्यातील १४० विद्यार्थी वसतिगृहात हजर होते. व्यवस्थापनाने १७५ जणांची तपासणी केली आहे. मात्र, पालकांनी आश्रमशाळेत गोंधळ घालून बाधित विद्यार्थ्यांसह चाचणी न झालेल्या विद्यार्थ्यांना घेऊन गेले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शाेधताना प्रशासनाची दमछाक हाेत आहे.