ग्रामीण भागातूनही कोरोना होतोय हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 12:03 AM2020-12-18T00:03:50+5:302020-12-18T00:04:01+5:30
३८४ रुग्णांवर उपचार सुरू; १७, ५७१ रुग्णांची मात
n लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मागील काही दिवसांपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. ग्रामीण भागातील १८ हजार ५२९ रुग्णांपैकी १७ हजार ५७१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत येथे ५७४ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अवघी ३७४ आहे. त्यामुळे ग्रामीण भागदेखील कोरोनामुक्तीकडे झपाट्याने वाटचाल करताना दिसत आहे. ग्रामीण भागात तब्बल २४०२ कंटेनमेंट झोन होते. त्यापैकी आता १०८ कंटेनमेंट झोन सुरू असून उर्वरित ठिकाणचे व्यवहार सुरळीत सुरू झाल्याने ग्रामीण भागासाठी ही दिलासादायक बाब आहे.
जिल्ह्यात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाने शिरकाव केला. त्यानंतर प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग तसेच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी कंबर कसली. रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी शासकीय व खासगी रुग्णालयांमध्येही विशेष व्यवस्था करण्यात आली. मात्र, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेल्याने यंत्रणेवरील ताण वाढला होता. अशा परिस्थितीतही जीवाची पर्वा न करता कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन रुग्णांचे जीव वाचवले. त्याची फलश्रुती ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस रुग्णसंख्येत होणारी घट, रुग्ण बरे होण्याचे वाढते प्रमाण आणि रुग्णालयातील रिकाम्या खाटांच्या रूपात दिसून येत आहे.
दिवाळीनंतर रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात होती. उलट डिसेंबरमध्ये ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आले.
दरम्यान, जिल्ह्यातील सहा महापालिकांसह शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, कल्याण आणि भिवंडी या पाच तालुक्यांतील ग्रामीण क्षेत्रात १६ डिसेंबरपर्यंत १८ हजार ५२९ इतकी रुग्णसंख्या आहे. त्यातही १०९६ रुग्ण हे शेद्रुण व म्हसा येथील आहेत. ग्रामपंचायत नसलेल्या कल्याण-डोंबिवली क्षेत्रातील रुग्ण (निळजे-बदलापूर) ५४११ आणि उर्वरित ठाणे ग्रामीणमधील १२,०२२ रुग्णांचा त्यात समावेश आहे. त्यातील १७ हजार ५७१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात ५७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तपशील एकूण रुग्ण अंबरनाथ कल्याण भिवंडी शहापूर मुरबाड
एकूण रुग्ण १८५२९ १७९० ५२८२ ६९९८ ३३२६ ११३३
बरे झालेले १७५७१ १७०८ ४९१८ ६६९७ ३१७५ १०७३
उपचार सुरू ३८४ १९ २४३ ८३ ३२ ०७
एकूण मृत्यू ५७४ ६३ १२१ २१८ ११९ ५३