कोरोनामुळे सामाजिक एकात्मतेचेही पटले महत्त्व!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 12:56 AM2020-08-03T00:56:34+5:302020-08-03T00:57:11+5:30

सोजल सावंत यांचे मत : वेबिनारमध्ये विद्यार्थ्यांना अ‍ॅप्सचे मार्गदर्शन

Corona also emphasizes the importance of social integration! | कोरोनामुळे सामाजिक एकात्मतेचेही पटले महत्त्व!

कोरोनामुळे सामाजिक एकात्मतेचेही पटले महत्त्व!

googlenewsNext

ठाणे : कोरोनामुळे उद्भवलेल्या या संकटकाळात कुटुंबीयांबरोबरच आपल्याला सामाजिक एकात्मतेचेही महत्त्व पटले आहे. नैराश्याच्या काळात स.प्र. ज्ञानसाधना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विश्वातील सर्व शिक्षक-विद्यार्थ्यांसाठी सामाजिक जाणिवेने साकारलेला हा उपक्रम निश्चितच प्रशंसनीय आहे, असे कौतुकोद्गार सोजल सावंत यांनी काढले.

सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या विद्यार्थी समितीच्या वतीने योग्य सामाजिक अंतराच्या या युगात 'विविध कलागुणांचे अनुसरण' या उद्देशाने द क्विंटेट आॅफ आर्टिस्ट्री (कलात्मक पंचकडी) या नावाने पाचदिवसीय कलात्मक वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. उपक्रमाच्या पहिल्या दिवशी उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. या उपक्रमासाठी भारतातीलच नव्हे, तर नेपाळ, यूके, कुवेत, भुतान, सौदी अरेबिया, हाँगकाँग या राष्ट्रांतील असंख्य विद्यार्थी व शिक्षकांनी नावनोंदणी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मराठे यांनी दिली.
उद्घाटनानंतर नॉलेज ब्रिज या संस्थेतील कार्यक्रम प्रशिक्षक भूषण सावंत यांनी 'व्हिडीओ गॅरेज' हा विषय मांडताना व्हिडीओ व आॅडिओचे सर्व घटक सविस्तरपणे मांडले. व्हिडीओ बनविण्याच्या काही सोप्या पद्धती त्यांनी समजावून सांगितल्या. आपल्या मोबाइलवरील काही सेटिंग वापरून व्यावसायिकदृष्ट्या उत्कृष्ट व्हिडीओ सहजपणे बनवता येतात. त्यासंदर्भात महाजालावर सहजपणे विनामूल्य उपलब्ध असलेल्या लेक्सिस आॅडिओ एडिटर, सिनेमा एफ ५, ओपन कॅमेरा अ‍ॅडॉसिटी या अ‍ॅपची परिपूर्ण माहिती दिली. काइनमास्टर, पॉवर डायरेक्टर या अ‍ॅप्सच्या साहाय्याने व्हिडीओ एडिटिंग कसे करावे, ते प्रात्यक्षिकांच्या साहाय्याने समजावले.

यू-ट्युबवर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण
पीपीटी सादरीकरणाला स्क्रीन रेकॉर्डिंग अ‍ॅपच्या मदतीने आकर्षक व्हिडीओचे रूप देता येते. एकही सबस्क्रायबर नसतानाही स्ट्रीमल अब्स या अ‍ॅपच्या मदतीने यू-ट्युबवर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करता येते. अशा अनेक अज्ञात बाबींची माहिती या सत्रात शिक्षक-विद्यार्थ्यांना मिळाली. आजच्या कार्यक्रमाची संपूर्ण सूत्रे विद्यार्थ्यांनी सांभाळली. कार्यक्रमाच्या सुुरुवातीला ज्ञानसाधनाचे माजी विद्यार्थी पंकज पितळे व भटू सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.

Web Title: Corona also emphasizes the importance of social integration!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.