CoronaVirus News : नव्या आयुक्तांना कोरोनासोबतच राजकीय दबावाचाही करावा लागणार सामना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 12:30 AM2020-06-25T00:30:34+5:302020-06-25T00:30:42+5:30
महापालिकेची विस्कटलेली आर्थिक घडी बसविण्यासह पावसाळ्यातील साथरोगांवर नियंत्रण मिळविण्याबरोबर धोकादायक इमारतींचा प्रश्नही योग्य पद्धतीने सोडवावा लागणार आहे.
ठाणे : अवघ्या तीन महिन्यांत विजय सिंघल यांची आयुक्तपदावरून उचलबांगडी करून त्यांच्या जागी ठाकरे सरकारने डॉक्टर विपिन शर्मा यांची नियुक्ती केली आहे. शर्मा हे डॉक्टर असल्याने ते कोरोनाला रोखण्यात यशस्वी होतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शिवाय, येथील राजकीय मंडळीशी आणि प्रस्थापित अधिकाऱ्यांशी त्यांना मिळतेजुळते घेऊन किंवा तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याप्रमाणे महापालिकेत काम करावे लागणार आहे. महापालिकेची विस्कटलेली आर्थिक घडी बसविण्यासह पावसाळ्यातील साथरोगांवर नियंत्रण मिळविण्याबरोबर धोकादायक इमारतींचा प्रश्नही योग्य पद्धतीने सोडवावा लागणार आहे.
प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर ते राज्य शासनाच्या सेवेत रुजू झाले होते. ते २००५ च्या बॅचचे आयएएस असून पुण्याच्या महाराष्टÑ एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचे महासंचालक म्हणून कार्यरत होते. ठाण्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून सिंघल यांच्या कार्यकाळात यावर नियंत्रण आले नसल्याने त्यांची बदली झाल्याचे बोलले जात आहे. परंतु, आता शर्मा हे स्वत: डॉक्टर असल्याने ते कोरोनावर कशी मात करणार, याकडे लक्ष लागले आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्याबरोबरच मृत्यू रोखण्यासाठी त्यांना उपाययोजना कराव्या लागणार आहेत. प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना येथे कशी वागणूक मिळते, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे त्यांना येथील प्रस्थापित मंडळीशी सांभाळून घ्यावे लागणार असून, राजकीय मंडळींशीदेखील त्यांना मिळतेजुळते घ्यावे लागणार आहे. याशिवाय, महापालिकेची खालावलेली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. बुधवारी त्यांनी आपला पदभार स्वीकारला असून महापालिकेतील विविध विभागांसमवेत बैठक घेऊन कोरोनाचा एकंदरीत आढावाही त्यांनी यावेळी घेतला.
।कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न करणार
कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आजच पदभार स्वीकारला आहे. सर्व विभागांतील अधिकाºयांशी चर्चा केली आहे. कोरोनाबाबत चर्चा केली, उपाययोजना बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पहिल्याच दिवशी सर्व विषयांवर बोलणे शक्य नाही. आणखी दोन ते तीन दिवसांत कशा प्रकारे नियोजन करणे शक्य आहे, याची माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.मला येथील परिस्थिती समजून घेऊ द्या. नेमकी परिस्थिती जाणून घेणार आहे. शहरातील सर्व विषयांवर चर्चा सुरूआहे. कोणते बदल करणे अपेक्षित आहे, कुठे कोणाची मदत घेता येईल, यासाठीदेखील चर्चा सुरूआहे. कोरोना रोखण्यासाठी जनजागृती गरजेची आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे, असे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सांगितले.