कोरोनाचा विनाकारण बाऊ केला जातोय : सयाजी शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 05:02 PM2020-05-13T17:02:41+5:302020-05-13T17:06:36+5:30
कोरोनाबद्दल भीती तयार केली जात आहे असे स्पष्ट मत सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.
ठाणे : कोरोनाला विनाकारण खूप महत्त्व दिले गेले. एवढे जीवघेणे किंवा कोरोनामुळे मानवाने सगळे बदलावे असे काही नाही. कोरोना कधी आला आणि कधी गेला हे कित्येकांना माहीत पण नसेल. आता स्वतःवरच विश्वास राहिलेला नाही. हात पण दर पाच मिनिटांनी धुवावे लागतात अशी खंत ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली.
आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय आयोजित संवाद मनांचा या कार्यक्रमात शिंदे यांची मुलखात ज्येष्ठ कवी डॉ. महेश केळुस्कर यांनी घेतली. यावेळी ते म्हणाले की, कोरोनाचा बाऊ केला गेलाय. त्या बद्दल भीती तयार केली आहे. कोरोनाने धडा दिला की, गर्दी करू नये, प्रतिकार शक्ती वाढवावी, विकासाच्या नावाखाली गुदमरून जाणे याला आळा बसला हे कोरोनाचे वैशिष्ट्य आहे. झाडांना प्राधान्य मिळेल. आपल्याला अन्न, ऑक्सिजन लागते ती जादू फक्त झाडांमध्ये आहे. खरी क्रिएटीव्हीटी ही जमिनीत, झाडांत आहे मग इतर क्रिएटीव्हीटीला महत्त्व येईल. माझ्या 5 कविता, पाच चित्रपट नसली तरी चालेल पण माझी स्वतःची पाच झाडे असावी जी 500 वर्षे जगतील आणि माझ्या पुढच्या पिढीला जगवतील. शेती या विषयाला हात घालत सयाजी शिंदे म्हणाले की, शेतकऱ्याला कळत नाही की त्याला कमी किंमत दिली जाते. 50 ते 60 वर्षे शेती केलेल्या शेतकऱ्याला विद्यापीठातुन शेतीची पदवी घेतलेला मुलगा शेती कशी करावी हे शिकविणार का ? शेतकऱ्याला खुप साखळ्यांमध्ये अडकवले गेले आहे अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. खरं तर शहरे दरिद्री आणि गावे श्रीमंत आहेत पण सगळ्यांनाच शहराची ओढ लागली आहे. कृत्रिम उपाय करून माणसाने स्वतःची जीवनशैली बदलली खरी पण त्यांनतर पुन्हा नैसर्गिक उपायांकडे वळत आहे. कोरोनानंतर जगण्याच्या मुळाकडे सर्वांना जावे लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले. आपली प्रतिकार शक्ती कमी होते कारण आपण पैसे देऊन सुख सोयीच्या मागे लागलो आहोत. माणसाने अनावश्यकपणे स्वतःच्या गरज वाढविल्या आहेत. जितक्या गरजा वाढल्या तितकी औषधे ही वाढली. कोरोनामुळे माणसाला निसर्गाचे महत्त्व कळेल. आता आदिवासींकडून शिकण्याची, त्यांना महत्त्व देण्याची गरज लागणार आहे असेही ते म्हणाले. मनोरंजन क्षेत्राला प्राधान्य राहणार नाही यावर मत व्यक्त करताना शिंदे म्हणाले की, या क्षेत्रात पुढील काही काळ बराच बदल असेल. नाट्यगृहात एकत्र येणे हे कमी होईल. हे क्षेत्र काही काळ बदलले असेल. शूटिंगसाठी डॉक्टर हे पात्र निवडले जाईल जे तपासणी करेल. यावेळी प्रा. डॉ. प्रदीप ढवळ व इतर मान्यवरही सहभागी झाले होते.