रेल्वे, बसस्थानकात होतेय कोरोनाची चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:38 AM2021-03-25T04:38:24+5:302021-03-25T04:38:24+5:30

मुरलीधर भवार लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाच्या साथीने पुन्हा डोकेवर काढले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची ...

Corona is being tested at the train and bus stand | रेल्वे, बसस्थानकात होतेय कोरोनाची चाचणी

रेल्वे, बसस्थानकात होतेय कोरोनाची चाचणी

googlenewsNext

मुरलीधर भवार

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाच्या साथीने पुन्हा डोकेवर काढले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या १५ दिवसांपासून चढ्या क्रमाने वाढत आहे. दिवसाला ७०० रुग्ण नव्याने आढळून येत आहेत. महापालिकेने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी जम्बो कोविड सेंटर आणि रुग्णालये उभारली आहेत. मात्र, परप्रांत आणि गावाकडून येणाऱ्या रेल्वे गाड्या आणि बसमधून येणाऱ्या प्रवाशांमुळेही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे त्याला अटकाव करण्यासाठी महापालिका हद्दीत रेल्वे स्थानक आणि बसस्थानकावर कोरोनाची चाचणी केले जात आहे. मात्र, महापालिकेच्या सीमेवरच कोरोना रोखण्यासाठी कुठेही चाचणी केंद्रे दिसून येत नाहीत. त्यामुळे महापालिकेने तेथे अशी केंद्रे सुरू करून कोरोना रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

--------------

कल्याण एसटी बसस्थानक

- कल्याण एसटी बस स्थानकातून दररोज ७० फेऱ्या चालविल्या जातात. त्यात शहरांतर्गत बसशिवाय नाशिक, धुळे, नगर, पुणे, कोल्हापूर, बीड, औरंगाबाद, अलिबाग, रत्नागिरी, चिपळूण आदी ठिकाणी बस सोडण्यात येतात.

- या परगावातून महापालिका हद्दीत येणाऱ्या प्रवाशांकरिता बस स्थानकात कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध आहे. तेथे सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत चाचणी केली जाते.

- मात्र बस स्थानकात रात्रंदिवस बस येत असतात. त्यामुळे दुपारी १ नंतर आलेल्या प्रवाशांची चाचणीच होत नाही. त्यात एखाद्याला लागण झालेली असल्यास इतरांनाही त्याची बाधा होण्याची दाट शक्यता आहे. परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव महापालिका हद्दीत होण्याची दाट शक्यता आहे.

---------------

कल्याण रेल्वेस्थानक

- कल्याण रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वे मार्गावरील जंक्शन आहे. या रेल्वे स्थानकातून लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे स्थानकात तीन शिफ्टमध्ये कोरोना चाचणी केले जाते.

- एका शिफ्टमध्ये २०० जणांची चाचणी केली जाते. तीन शिफ्टमध्ये किमान ६०० जणांची चाचणी केली जाते. प्रत्यक्षात परगावाहून महापालिका हद्दीत येणाऱ्या प्रवाशांची संख्या आणि होत असलेल्या चाचण्यांचे प्रमाण कमी आहे.

- त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानकात हजारो प्रवासी चाचणीच्या प्रक्रियेतून सुटत आहेत. त्यांची चाचणीच होत नाही.

------------------

केडीएमसीच्या सीमा

- कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीच्या बहुतांश सीमा आहेत. त्यात अनेक एंट्री पॉइंट आहे.

- मनपा हद्दीत उल्हासनगरातून वालधुनी येथे प्रवेश केला जातो. कल्याण-भिंवडी मार्गाने दुर्गाडी येथे प्रवेश केला जातो. तर, कल्याण-मुरबाड रस्त्यावरून शहाड येथे प्रवेश केला जातो.

- कल्याण-शीळ रस्त्यावरून शीळ येथे प्रवेश केला जातो. कल्याण-पनवेल येथून तळोजा खोणी येथे प्रवेश केला जातो. या एंट्री पॉइंटवर कोरोना चाचण्या केल्या जात नाहीत.

----------------------

वाढत्या संसर्गावर उपाययोजना काय?

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरातील फेरीवाले, दुकानदार, तेथे काम करणारे कर्मचारी यांच्या अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. बसस्थानक आणि रेल्वे स्टेशनवर चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या चाचणीचे प्रमाण वाढविले जात आहे. परगाव आणि परप्रांतातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे. त्यांचा नाव, पत्ता, मोबाइल नंबर, आदी माहिती एका फॉर्ममध्ये भरून घेतली जात आहे.

---------------------

महापालिका हद्दीत कोरोनो रोखण्यासाठी जम्बो कोविड रुग्णालये आहेत. सध्या चाचणीचे प्रमाण वाढवले असून, ते दुप्पट केले जाणार आहे. रेल्वे व बसस्थानकावर चाचणी केले जात आहे. सगळी माहिती गोळा केली जात आहे. महापालिकेच्या सीमेवरील एंट्री पॉइंटवर चाचणी केंद्र नाही. मात्र त्याचाही विचार यापुढे करून त्या प्रकारचे नियोजन करण्याचा प्रयत्न केला जाईल.

-डॉ. प्रतिभा पानपाटील, वैद्यकीय अधिकारी, केडीएमसी.

------------

Web Title: Corona is being tested at the train and bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.