कोरोनामुळे यंदाही औषधवारीत पडला खंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:49 AM2021-07-07T04:49:59+5:302021-07-07T04:49:59+5:30
ठाणे : गेली ३८ वर्षे वारकऱ्यांची अखंड सेवा करण्यासाठी ठाण्यातून निघणाऱ्या औषधवारीत यंदाही खंड पडला आहे. कोरोनामुळे सलग दुसऱ्या ...
ठाणे : गेली ३८ वर्षे वारकऱ्यांची अखंड सेवा करण्यासाठी ठाण्यातून निघणाऱ्या औषधवारीत यंदाही खंड पडला आहे. कोरोनामुळे सलग दुसऱ्या दिवशी ती रद्द करावी लागली आहे. पुढच्या वर्षी मात्र वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळू दे, असे साकडे विठुरायाला घातले जाणार आहे.
“विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” असा विठुरायाचा जयघोष करून वारकरी दरवर्षी पंढरपूरला दर्शनासाठी जातात. त्यांच्या सेवेसाठी ज्ञानदेव सेवा मंडळाच्या वतीने व डॉ. ओमप्रकाश शुक्ल यांच्या पुढाकाराने १९८२ सालापासून ठाणे शहरातून औषधवारी निघते. परंतु, कोरोनामुळे सलग दोन वर्षे वारीमध्ये खंड पडला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही वर्षी मंडळाने औषधवारी रद्द केल्या आहेत. गेल्या वर्षी मुक्कामाचे ठिकाण निश्चित केलेले असताना औषधवारी रद्द करावी लागली होती. तसेच, या वर्षी नक्की औषधवारी असेल, असे वाटत असताना कोरोनाचे सावट टळले नसल्याने ती रद्द करावी लागली आहे.
१९८२ सालापासून ओमप्रकाश शुक्ल, अच्युत जोशी, गोविंद मुंदडा, डॉ आंबर्डेकर, डॉ. फडके या पाच जणांच्या टीमने सुरू केलेल्या औषधवारीत १९८८ सालापासून २५ जणांची टीम जाऊ लागली. यात ८ डॉक्टर्स, उत्तर वैद्यकीय कर्मचारी आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असतो. नऊ महिने औषध गोळा करून झाल्यानंतर तीन महिने या औषधांचे वर्गीकरण मंडळाच्या सभागृहात दर रविवारी केले जाते. यंदा, मात्र या सर्व कामात खंड पडला आहे, असे डॉ. शुक्ल म्हणाले. सरकारचे धोरण अगदी योग्य आहे, या वर्षी पुन्हा एकदा औषधवारी रद्द झाली असली तरी पुढल्या वर्षी या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला दे, असे साकडे विठुरायाच्या चरणी घालणार असल्याचे ते म्हणाले.
-----------------------
औषधवारी रद्द झाली असली तरी गावातील वारकरी आठवणीने संपर्क करून तुम्ही आमची सेवा किंवा आमच्या आईवडिलांना औषधपाणी द्यायचे. आज त्या प्रसंगांची आठवण होत असल्याचे सांगतात.
-----------------------
या औषधवारीत सर्व प्रकारांची औषधे ठेवली जात. वारकऱ्यांना वारीदरम्यान प्रामुख्याने ताप, जुलाब उलटी, सांधेदुखी, पायाला गोळे येणे, चक्कर, मलेरिया, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागते. त्यावर उपचार करण्यासाठी डॉ. शुक्ल आणि त्यांची टीम सज्ज असते.
-----------------------
फलटण - बरड - नातेपुते - माळशीरस - वेळापूर - वाडीपुरोळी - वाखरी या ठिकाणी मंडळाच्या वतीने शिबिर भरविले जाते.
-------