कोरोनामुळे यंदाचा व्हॅलेंटाइन डे उत्साहात, पण व्हर्च्युअल करू साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 12:43 AM2021-02-11T00:43:10+5:302021-02-11T00:43:22+5:30

तरुणाईमध्ये कमालीची जागरुकता

Corona celebrates this year's Valentine's Day in excitement, but do virtually | कोरोनामुळे यंदाचा व्हॅलेंटाइन डे उत्साहात, पण व्हर्च्युअल करू साजरा

कोरोनामुळे यंदाचा व्हॅलेंटाइन डे उत्साहात, पण व्हर्च्युअल करू साजरा

Next

ठाणे : येत्या रविवारी व्हॅलेंटाइन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस आहे. दरवर्षी वाट पाहत असलेल्या या दिवसावर यंदा मात्र कोरोनाचे संकट आहे. पुढचे अनेक व्हॅलेंटाइन डे साजरे करायचे असतील तर यंदा घरीच, सुरक्षित राहा. प्रत्यक्ष भेटण्याचा अट्टहास न करता ऑनलाइनदेखील हा दिवस साजरा करता येऊ शकतो, अशी मते तरुणाईमधून व्यक्त होत आहेत. 

फेब्रुवारीचा दुसरा आठवडा हा व्हॅलेंटाइन वीक म्हणून साजरा केला जातो. या आठवड्यातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे. हा आठवडा ‘’रोज डे’’ला सुरू होऊन ‘’व्हॅलेंटाइन डे’’ला संपतो. सात दिवसांत येणारे विविध डेज ही तरुणाई मोठ्या उत्साहाने साजरे करताना दिसत असते. महाविद्यालयात वेगळाच उत्साह या आठवड्यात तरुणाईमध्ये पाहायला मिळत असतो. तसेच प्रेमी आणि प्रेमिका एकमेकांसाठी वेगवेगळ्या भेटवस्तू देत असतात. या आठवड्यात आपल्या जवळच्या आणि आवडत्या व्यक्तीला आपल्या मनातील प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळते. या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत मॉल्स, हॉटेलमध्ये हा दिवस साजरा करायला तरुण मंडळींची गर्दी असते. दुकाने, मॉल, रेस्टॉरंट या दिवशी हार्ट शेपने सजवलेली पाहायला मिळतात. अनेक ऑफर्सही यावेळी असतात. कोरोनामुळे यंदा मात्र तरुणाईच्या उत्साहावर विरजण पडणार आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाता कुटुंबासोबत एक वर्ष हा दिवस साजरा करायला हरकत नाही, तर शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करून हा दिवस साजरा करावा, अशी मते तरुण मंडळी व्यक्त करीत आहे.

व्हॅलेंटाइन डे’ सार्वजनिक ठिकाणी भेटूनच साजरा केला पाहिजे, हा अट्टहास करणं, मुख्यत्वे कोरोनाकाळात योग्य नाही. आपल्या आयुष्यातल्या खास व्यक्तीला एखादी भेटवस्तू ऑनलाइन पाठवणं, व्हिडीओ कॉलवरून संवाद साधणं आणि आपल्या भावना व्यक्त करणं, अशा नव्या पद्धतीने आपण व्हॅलेंटाइन डे साजरा करू शकतो. या व्यतिरिक्तसुद्धा आपल्या कुटुंबीयांसोबत हा दिवस साजरा करणे, हे आपल्या कुटुंबीयांना, या दिवशी, एक वेगळंच सरप्राइझ असेल !
- कौस्तुभ बांबरकर

शासनाने आखलेल्या नियमांचं पालन करून जर प्रत्यक्षात भेटणं आणि एन्जॉय करणं शक्य असेल तर का करू नये. तसंही आपण आपले इतर सण पण साजरे केलेच आणि जर भेटणं शक्य नसेल तर या लॉकडाऊनमध्ये आपण इतर ऑनलाइन पर्याय पण शिकलोच आहोत. ऑनलाइन मीटिंगसारखं ऑनलाइन डेटसुद्धा होऊच शकते. तसं तर प्रेम व्यक्त करायला एका विशिष्ट दिवसाची गरज नसते.  - प्रणीत गिरकर

कोरोनाचे सावट अजून गेले नसताना व्हॅलेंटाइन डे  साजरा करावा की नाही?  प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. सकारात्मक आणि नकारात्मक. प्रेम हे एकाच दिवशी साजरेेे का करायचे? माझ्या मतानुसार, हा एकच नाही? तर असे अनेक व्हॅलेंटाइन डे जर आपल्या पार्टनरसोबत साजरे करायचे? असतील तर... घरीच राहा, सुरक्षित राहा आणि आनंद पसरवा. 
- प्राजक्ता सावंत

सध्याची परिस्थिती बघता कुठलाही सण, इव्हेंट साजरे करण्याची आवश्यकता नाही आणि त्यातल्या त्यात व्हॅलेंटाइन डे अजिबातच नाही. हा सण आपल्या जीवापेक्षा किंवा इतरांना असुरक्षित ठेवून साजरा करणे इतका महत्त्वाचा आहे का? यावर्षी कुठेही गर्दी करून सण साजरे करू नये, हीच इच्छा.  
- दीपक तपासे

सध्याची स्थिती पाहता व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यात येऊ नये. कोरोनाचा पूर्ण अंत होत नाही, तोपर्यंत आपण विनाकारण गर्दी टाळली पाहिजे... नाहीतर २०२१ मध्ये ही २०२० सारखी लॉकडाऊनची परिस्थिती येऊ शकते.
- नितीन यादव

Web Title: Corona celebrates this year's Valentine's Day in excitement, but do virtually

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.