कोरोनाचा परिणाम : खाडी, तलावाचे पाणी झाले स्वच्छ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 12:31 AM2020-12-22T00:31:36+5:302020-12-22T00:32:36+5:30
Thane : मूर्ती विसर्जनामध्ये ३७ टक्के घट नोंदविली आहे. अनेक नागरिकांनी घरच्या घरी विसर्जनाची संकल्पना अंमलात आणली.
ठाणे : कोरोनामुळे कधी नव्हे, ते ठाण्यातील खाडीच्या पाण्याची गुणवत्ताही सुधारली आहे. सोबतच महापालिकेचे कृत्रिम तलाव आदींच्या पाण्याची गुणवत्ताही सुधारली, परंतु शहरातील साठवणुकीच्या पाण्याची गुणवत्ता घसरल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
गणेशोत्सवात गेल्या वर्षी ३७ हजार ६० मूर्तीचे विसर्जन झाले होते. यावेळी कोरोनामुळे २३ हजार ११७ मूर्तीचे विसर्जन झाले. मूर्ती विसर्जनामध्ये ३७ टक्के घट नोंदविली आहे. अनेक नागरिकांनी घरच्या घरी विसर्जनाची संकल्पना अंमलात आणली.
अनेकांनी मातीच्या, तसेच शाडू मातीच्या मूर्तींना पसंती दिली. त्यामुळे जलप्रदूषण कमी झाले. दुसरीकडे पाण्यातील जैविक पर्यावरण निरोगी राहण्यासाठी विरघळलेला ऑक्सिजन ४ मिली ग्रॅम / प्रति लीटरपेक्षा जास्त असणे गरजेचे असते. महापालिका क्षेत्रातील ३५ तलावांच्या पाण्याच्या नमुन्यांची चाचणी प्रदूषण नियंत्रण कक्षाने केली. त्यात दिवा तलाव वगळता, उर्वरित सर्व तलावांमध्ये विरघळलेला ऑक्सिजन ४ मिली ग्रॅम / प्रति लीटरपेक्षा जास्त आढळला.
साठवणुकीच्या पाण्याची गुणवत्ता घसरली
- महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरातील वितरण प्रणाली, तसेच साठवणुकीच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी एप्रिल, २०१९ ते मार्च, २०२० या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणाहून नमुने घेतले.
- त्यात वितरण प्रणालीच्या पाण्याच्या १२ हजार ९०१ नमुन्यांपैकी ९५ टक्के नमुने पिण्यायोग्य आढळले. ५ टक्के नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे आढळून आले आहे.
- साठवणुकीच्या टाक्यांमधील पाण्याचे १८ हजार ९८८ नमुने तपासण्यात आले होते. त्यापैकी ८० टक्के नमुने पिण्यायोग्य, तर २० टक्के नमुने पिण्यास अयोग्य आढळून आले आहेत.
- अशा परिस्थितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वितरण प्रणाली आणि साठवणुकीच्या पाण्याची गुणवत्ता एक टक्क्याने सुधारल्याचा दावा करण्यात आला आहे.