कोरोनाचा परिणाम : टाळेबंदीपूर्वी प्रदूषण जास्त, महापालिकेचा पर्यावरणविषयक अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 12:27 AM2020-12-22T00:27:45+5:302020-12-22T00:32:14+5:30
Thane : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नुकताच पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल २०१९-२० सादर केला आहे. यामध्ये काही ठळक बाबी नमूद आहेत.
ठाणे : लॉकडाऊनमुळे या वर्षी शहरातील हवा, पाणी आणि ध्वनिप्रदूषणात कमालीची घट झाली. या तीनही घटकांतील प्रदूषण यंदा मध्यम स्वरूपात गणले गेले आहे. मार्च ते सप्टेंबर या कालावधीत शहरात अनेक कामे ठप्प होती. मेट्रोचे कामही थांबले होते. वाहनांचा वेगही जवळजवळ मंदावला होता. त्यामुळे शहराच्या हवामानावर त्याचा चांगला परिणाम झाल्याचे महापालिकेच्या पर्यावरण सद्य:स्थिती अहवालातून स्पष्ट झाले आहे. तीनहात नाक्यावरील अतिप्रदूषित क्षेत्रातही यंदा मध्यम प्रदूषित आढळले आहे.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नुकताच पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल २०१९-२० सादर केला आहे. यामध्ये काही ठळक बाबी नमूद आहेत. ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने हवा गुणवत्ता मापनासाठी निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा तीन क्षेत्रांची विभागणी केली होती. तेथील हवेतील प्रदूषकांचे मापन करण्यात आले. त्यानुसार, निवासी क्षेत्र अर्थात कोपरी प्रभाग कार्यालय, व्यावसायिक क्षेत्रात शाहू मार्केट, नौपाडा आणि औद्योगिक क्षेत्रातील रेप्टाकोस, ब्रेट ॲण्ड कंपनी येथील हवा मध्यम स्वरूपाची आढळली आहे. विशेष म्हणजे, तीन हात नाका हा परिसर दरवर्षी अतिप्रदूषित क्षेत्रात गणला जातो. यंदा मात्र, येथील हवाही प्रदूषित, मध्यम आणि समाधानकारक गटात मोडली आहे. शहरातील विविध चौकांमध्ये टाळेबंदीपूर्वी, म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात आणि टाळेबंदीनंतर म्हणजेच एप्रिल महिन्यात हवा प्रदूषकांचे मापन केले. शहरातील जीवनमान फेब्रुवारीपर्यंत सुरळीत होते. वाहतूक आणि बांधकाम व्यवसाय जोरात सुरू होते. त्यामुळे या काळात शहराची हवा प्रदूषणाची पातळी मध्यम श्रेणीत होती. सर्वच चौकातील सूक्ष्म धूलिकणाचे प्रमाण दिलेल्या मानकांपेक्षा म्हणजेच १०० पेक्षा जास्त होते. टाळेबंदीनंतर शहराचे जीवनमान ठप्प झाले. परिणामी, शहराची हवा प्रदूषण पातळी समाधानकारक श्रेणीत आली.
वाहनांवर हवे नियंत्रण
अनलाॅकमध्ये रस्त्यांवर वाहनांची वर्दळ हळुहळु वाढत आहे. वायू प्रदुषणात भर टाकणाऱ्या महत्त्वाच्या घटकांमध्ये वाहनांमधून होणाऱ्या उर्त्सजनाचा समावेश असतो. चांगल्या आरोग्यासाठी वायू प्रदुषण नियंत्रणात हवे असे ठाणेकरांना वाटत असेल तर वाहनांचे प्रमाणही नियंत्रणात हवे, असे मत जाणकारांनी व्यक्त केले.