कोरोनाने हिरावले अडीच हजार महिलांच्या कपाळावरील कुंकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:27 AM2021-06-11T04:27:22+5:302021-06-11T04:27:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. कोणाच्या घरातील कर्ता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. कोणाच्या घरातील कर्ता पुरुष यात गेला तर कोणाच्या घरातील महिला, कोणाच्या घरातील ज्येष्ठ नागरिक हिरावले गेले; परंतु यामध्ये जिल्ह्यातील सुमारे दोन हजार ७०० महिलांच्या कपाळावरील कुंकूही या कोरोनाने हिरावून गेले आहे. त्यामुळे या महिला निराधार झाल्या आहेत. त्यांच्या घरातील कमावता माणूसच गेल्याने आता घराचा गाडा कसा हाकायचा, असा पेच त्यांच्यासमोर ठाकला आहे; परंतु दुसरीकडे अशा निराधार महिलांचा सर्व्हे सध्या जिल्हा महिला बाल विकास विभागाकडून सुरू झाला आहे. त्यानुसार शासनाच्या चार योजनांचा फायदा अशा महिलांना मिळावा यासाठी जिल्हा यंत्रणादेखील कामाला लागली आहे.
दीड वर्षापासून ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत नऊ हजार ५८८ जणांचा मृत्यू झाला आहे. यात अनेकांचे संसार कोरोनाने हिरावून घेतले आहेत. तर अनेकांचे अख्खे कुटुंबच संपवून टाकले आहे. तर काही घरातील महिलांचे कुंकूच या कोरोनाने हिरावल्याने आता जगायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. जिल्हा महिला बाल विकास विभाग धान्यांचे किट सध्या अशा निराधार महिलांना पुरवीत आहे; परंतु केवळ त्याच्यावर घरच्या सर्वच गरजा कशा भासणार, मुलांचे शिक्षण, घरभाडे, घरातील इतर खर्च कसे भागवायचे, अशा अनेक प्रश्नांनी या महिला भांबावून गेल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी शासनाच्या काही योजना आहेत, याची माहितीदेखील घेतली जात आहे; परंतु अद्यापही त्याची माहिती या महिलांपर्यंत पोहोचू शकलेली नाही.
जिल्ह्याच्या महिला बाल विकास विभागाने आता अशा महिलांचा सर्व्हे सुरू केला आहे. येत्या काही दिवसांत तो पूर्ण होणार आहे; परंतु अशा २ हजार ७०० च्या आसपास महिला असतील, असा अंदाज या विभागाने वर्तविला आहे. हा सर्व्हे करताना या महिला कोणत्या गटात मोडतात, त्यांची घरची परिस्थिती कशी आहे, सदरची महिला कामाला जाते का? आदींसह इतर माहिती या माध्यमातून घेतली जात असून त्यानंतर त्यांना चारपैकी कोणत्या योजनेचा फायदा देता येऊ शकणार आहे, हे निश्चित करून त्यानुसार गट तयार केले जाणार आहेत.
कोरोनाने २७०० महिलांना केले निराधार
जिल्ह्यात कोरोनाने अनेकांचे बळी आतापर्यंत गेले आहेत; परंतु यात दोन ७०० महिलांना कोरोनाने निराधार केले असल्याची माहिती समोर आली आहे. या महिलांचा सर्व्हे आता सुरू झाला आहे. तो येत्या काही दिवसांत पूर्ण होणार असून त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. तूर्तास या महिलांना धान्याचे किट दिले गेले आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण
५,२१,२७५
बरे झालेले रुग्ण
५,०५,७५६
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण
५९३१
असा करा अर्ज
सध्या अशा निराधार महिलांचा सर्व्हे सुरू आहे. तो करताना त्या कोणत्या आर्थिक गटात मोडत आहे, याची माहिती घेतली जात आहे. त्यानुसार त्यांनी कोणत्या योजनेसाठी अर्ज करावा याची माहिती दिली जाणार आहे. यामध्ये संजय गांधी निराधार योजना, केंद्र शासनाची निराधार योजना आहे, राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना आणि आणखी एक योजना आहे, ज्यामध्ये साडेचार लाखांची मदत दिली जाऊ शकणार आहे. तसेच या योजनांचे निकष वेगवेगळे आहेत. त्या आधारावर अर्ज करून अशा महिलांना मदत दिली जाणार आहे.
सध्या अशा प्रकारच्या निराधार महिलांचा सर्व्हे सुरू आहे. येत्या काही दिवसांत तो पूर्ण होणार आहे. त्यानुसार महिलांचा आर्थिक निकषानुसार सर्व्हे करून कोणत्या योजनांचा लाभ कोणाला कसा देता येऊ शकतो, त्यानुसार या महिलांना मदत दिली जाणार आहे.
(महेंद्र गायकवाड - महिला बाल विकास अधिकारी - ठाणे जिल्हा)