संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी कोरोनामुक्त गाव स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:48 AM2021-09-09T04:48:10+5:302021-09-09T04:48:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये जिद्द निर्माण व्हावी, यासाठी राज्य शासनाने कोरोनामुक्त गाव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये जिद्द निर्माण व्हावी, यासाठी राज्य शासनाने कोरोनामुक्त गाव स्पर्धा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत आपल्या जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी बहुतांशी सरपंच व ग्रामसेवकांशी ऑनलाइन संवाद साधत या स्पर्धेची माहिती दिली.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर देण्याची गरज आहे. त्यासाठी कुटुंब सर्वेक्षण पथक तयार करणे, विलगीकरण कक्षाची स्थापना, कोरोना तपासणीसाठी रुग्णालयात नेणाऱ्या वाहनचालकांचे पथक, कोरोना हेल्पलाइन पथक, लसीकरण पथक आदी पंचसूत्रीनुसार गावात तयारी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या नियोजनाची जबाबदारी प्रामुख्याने सरपंच व ग्रामसेवक यांनी घेऊन गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. या पंचसूत्रीनुसार काम केल्यास ग्रामपंचायतीला कोरोनामुक्त गाव स्पर्धेत हमखास यश मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
आझादी का अमृत महोत्सव उपक्रम राबवणार
देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्र शासनातर्फे सुरू असलेल्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ हा उपक्रमही प्रत्येक ग्रामपंचायतीत उत्साहाने राबवावा. कोरोना नियंत्रण नियमांचे काटेकोरपणे पालन करून विविध कार्यक्रम ग्रामपंचायतस्तरावर घ्यावेत, असेही दांगडे म्हणाले. यावेळी उपमुख्य कार्यकारी चंद्रकांत पवार यांनी या दोन्ही उपक्रमांची माहिती दिली.
----------------