कोरोनाला वाकुल्या दाखवत वर्षभरात झाले ३८३७ विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:44 AM2021-04-28T04:44:02+5:302021-04-28T04:44:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क स्नेहा पावसकर ठाणे : गेल्या वर्षी कोरोना आला आणि आपण सगळेच लॉकडाऊनमुुळे घरात बसलो. पण काही ...

Corona had 3837 marriages during the year | कोरोनाला वाकुल्या दाखवत वर्षभरात झाले ३८३७ विवाह

कोरोनाला वाकुल्या दाखवत वर्षभरात झाले ३८३७ विवाह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क स्नेहा पावसकर

ठाणे : गेल्या वर्षी कोरोना आला आणि आपण सगळेच लॉकडाऊनमुुळे घरात बसलो. पण काही महिने जसे हळूहळू अनलॉक होऊ लागले तसे पुन्हा एकदा कार्यालये, व्यवहार, उत्सव, सोहळ्यांना थोडक्या माणसांमध्ये करण्याची परवानगी मिळू लागली. कोरोनाची धास्ती तर गेले वर्षभर आपण घेऊन फिरतोय. पण त्यातही त्याच कोरोनाला वाकुल्या दाखवत गेल्या मार्चपासून ते या मार्चपर्यंत ठाणे जिल्ह्यात सुमारे ३,८३७ जोडप्यांनी रजिस्टर्ड मॅरेज केले.

कोरोना महामारीला एक वर्ष नुकतेच पूर्ण झाले. मध्यंतरीच्या काळात सण, उत्सव, घरगुती सोहळे, विवाह यांना मोजक्या माणसात करण्याची मुभा दिली होती. तसे नियम घातले होते. काही ठिकाणी हे नियम मोडले गेले खरे; पण ठाणे जिल्ह्यात मात्र गेल्या वर्षभरात नियम पाळत लग्नसोहळे झाले. विशेष म्हणजे वारेमाप खर्च टाळण्याच्या दृष्टीने आणि कमी माणसांच्या उपस्थितीचे बंधन असल्याने अनेकांनी नोंदणी करून रजिस्टर्ड मॅरेज करण्यावर भर दिलेला पाहायला मिळाला. २०२० मध्ये एप्रिल महिन्यात कडक लॉकडाऊन होता. परिणामी कोणीही घराबाहेर पडले नाही किंवा लग्नाच्या दृष्टीने नियोजन केले नाही. त्यामुळे एप्रिल २०२० मध्ये एकही विवाह ठाण्यात झाला नाही. तर तुलसी विवाहानंतर मुहूर्त पाहून अनेकांनी लग्नाचा बार उडवला. इतकेच काय तर मुहूर्त नसतानाही गेल्यावर्षी अनेकांनी लग्नसोहळे उरकले.

--------------

अनेक वस्तू मनासारख्या मिळाल्याच नाहीत

मार्च २०२० मध्ये कोरोना महाराष्ट्रात दाखल झाला आणि बघताबघता लॉकडाऊन झाले. पण त्यातही केवळ एप्रिलचा महिना सोडला तर अनेकांनी उर्वरित महिन्यांत अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या माणसात विवाह सोहळे केले. त्यावेळी विवाहासाठी लागणाऱ्या अनेक वस्तूही लॉकडाऊनमुळे काहींना खरेदी करता आल्या नव्हत्या. मात्र जे उपलब्ध आहे त्यात तडजोड करून अनेक जण जोडपी विवाहासाठी पोहोचली होती.

-------------------

गेल्यावर्षी अनलॉकनंतर काही प्रमाणात विवाह सोहळे झाले. मात्र ते अगदी नगण्य होते. अन्यथा आमच्याकडे एकाच दिवशी खूप विवाह होतात. परंतु त्यांची संख्या मे ते ऑक्टोबरपर्यंत कमी होती. मात्र तुलसी विवाह झाल्यावर पुन्हा विवाहसंख्या वाढली. त्याचदरम्यान कोरोनाचा प्रादुर्भावही ओसरला होता. मात्र आता पुन्हा एकदा प्रादुर्भाव वाढू लागल्याने अनेक विवाहइच्छुकांनी आपले मुहूर्त पुढे ढकलले आहेत, अशी माहिती एका मंगल कार्यालय चालकाच्या कर्मचाऱ्याने दिली.

--------------

आम्ही गेल्यावर्षी ठरलेल्या मुहूर्तावर विवाह केला. पण अगदी मोजक्या माणसांमध्ये; परंतु आम्हाला वधुवरांना अनेक वस्तू खरेदी करता आल्या नाहीत. अगदी लग्नासाठीचे ठरलेले कपडे दुकाने बंद असल्याने मिळाले नाहीत. त्यामुळे आईच्या साड्या व इतर कपड्यांचा वापर करून आम्ही लग्नाला उभे राहिलो.

अक्षरा, वधू

-----------------

कोरोनामुळे गेल्या वर्षभरात अनेकांनी रजिस्टर्ड विवाह करण्याला पसंती दिली आणि मुळात मध्येच कोरोनाचा संसर्ग कमी झाला होता. त्यामुळे मुहूर्त पाहून अनेकांनी विवाह उरकून घेतले.

ए.एस. यादव, प्र. विवाह नोंदणी अधिकारी, ठाणे

------------

गेल्या २०२० या वर्षात ठाण्यात झालेले रजिस्टर्ड विवाह

जाने २०२० - ४५४

फेब्रु २०२० - ५३४

मार्च २०२० - २५८

एप्रिल २०२० - ००

मे २०२० - ४३

जून २०२० - ९२

जुलै २०२० - १८७

ऑगस्ट २०२० - १९८

सप्टें २०२० - १९०

ऑक्टो २०२० - २८५

नोव्हें २०२० - ४१०

डिसेंबर २०२० - ६५८

२०२१ च्या नवीन वर्षातील विवाह

जाने २०२१ - ४९३

फेब्रु २०२१ - ५५२

मार्च २०२१ - ४७१

एप्रिल २०२१ -३८६

Web Title: Corona had 3837 marriages during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.