कोरोना लसीकरणासाठी घ्यावे लागत आहे कष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:34 AM2021-05-03T04:34:56+5:302021-05-03T04:34:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीत ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांच्या कोरोना लसीकरणासाठी सोय उपलब्ध ...

Corona has to be taken for vaccination | कोरोना लसीकरणासाठी घ्यावे लागत आहे कष्ट

कोरोना लसीकरणासाठी घ्यावे लागत आहे कष्ट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीत ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांच्या कोरोना लसीकरणासाठी सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने खाजगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली. त्याचबरोबर महापालिकेचीही केंद्रे बंद केली. एकाच केंद्रावर सध्या लसीकरण सुरू आहे. त्यात १८ वर्षांपासून ते ४५ वर्षांपर्यंतच्या नागरिकांनाही लस देण्याचे जाहीर करण्यात आल्याने ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना लसीकरणासाठी मोठे कष्ट करावे लागत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि गोंधळाची परिस्थिती पाहायवास मिळत आहे.

वृद्ध दाम्पत्य कल्याण आर्ट गॅलरीच्या लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी पोहोचले. पती ८०, तर पत्नी ७५ वर्षांची. दोघांनाही रक्तदाब आणि मधुमेहाचा आजार होता. त्याठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी तुम्ही कोव्हॅक्सिनचा डोस घेऊ नका, तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुम्ही कोविशिल्ड लसीचा डोस घ्यावा, असा सल्ला दिला. या दोन्ही वृद्धांनी लस न घेताच घरची वाट धरली. त्यांच्या मुलाने त्यांच्या लसीकरणाची सोय वाशिंद येथील आरोग्य केंद्रावर केली. त्याठिकाणी त्या दोघांनी लस घेतली. अन्यथा त्यांना लसीकरणापासून वंचित राहावे लागले असते. महापालिकेने लसीकरणासाठी केंद्रे सुरू केली. त्यानंतर खाजगी रुग्णालयांमध्येही केंद्रे सुरू केली गेली. मात्र, गेल्या महिनाभरापासून लसीचा तुटवडा पाहता अनेक खाजगी रुग्णालयात लसच उपलब्ध होत नसल्याने ही केंद्रे बंद करण्याची वेळ महापालिकेवर आली. ही केंद्रे बंद केल्याने जवळपास लसीकरणासाठी केंद्रे नव्हती. लसीकरण केंद्रे सुरू करण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधींकडून केली जात असताना लसीचा साठा नसल्याने खाजगी ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करता येत नाही. आता तर महापालिकेने ऑनलाइन स्लॉट बुक केल्याशिवाय लस दिली जाणार नाही, असे सांगितल्याने ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांमध्ये अधिकच संभ्रमाचे वातावरण आहे.

अनेकांना ऑनलाइन स्लॉट कसा काय बुक करायचा, हे माहिती नाही. तसेच ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी मुले नाहीत. केवळ दोघेच जण घरात राहतात. त्यांचे वयही जास्त असल्याने घराबाहेर पडता येत नाही. त्यांनी बाहेर जाऊन ऑनलाइन पद्धती समजून घाव्या. बाहेर पडणे म्हणजे कोरोनाला आमंत्रण देण्यासारखे होईल, अशा द्विधा मन:स्थितीत ही मंडळी अडकली आहे. काही नागरिकांकडून ऑनलाइन स्लॉट बुक करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याठिकाणी कोणत्या केंद्रावर स्लॉट किती शिल्लक आहे याचा तपशील येत नाही, अशा तक्रारी आहेत. तर काहींची स्थिती यापेक्षा उलट आहे. काही नागरिकांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर ते लसीकरणासाठी प्रयत्न करतात. हा अत्यंत धोकादायक प्रयत्न ठरू शकतो. तर काहींना कोरोनासदृश लक्षणे आढळल्यावर त्यांच्याकडून उपचार घेण्याऐवजी लस कुठे मिळेल, अशी विचारणा केली जात आहे. महापालिकेने ऑनलाइन रजिस्ट्रेशनची सक्ती केली आहे. लसीचा तुटवडा, स्लॉट कमी आणि लस घेण्यासाठी इच्छुक असलेल्यांचे प्रमाण जास्त. या सगळ्या गडबडीत लसीकरणाबाबत संभ्रम आणि गोंधळाची परिस्थिती कायम आहे. ज्यांच्या घरी कोणी नाही. केवळ दोघे जण राहत आहेत त्यांना लसीकरण केंद्रावर नेणार कोण? असा प्रश्न आहे.

---------------------------------

आमचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणार कोण?

डोंबिवलीचे शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी त्यांच्या प्रभागात ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून रिक्षाची सोय केली आहे. मात्र, ज्यांच्या प्रभागात अशी सोयच नाही त्यांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचविणार कोण? त्यांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणार कोण? या समस्या कायम आहेत. कारण वयोमानानुसार ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे त्यांना उमगत नाही.

Web Title: Corona has to be taken for vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.