कोरोनामुळे जि.प.शाळांच्या सर्व्हेला ‘बाधा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:27 AM2021-06-17T04:27:27+5:302021-06-17T04:27:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : एकीकडे कोरोनामुळे जिल्ह्यातील एकही शाळा अद्यापही सुरू होऊ शकलेली नाही. दुसरीकडे जिल्ह्यात असलेल्या ...

Corona 'hinders' ZP school survey | कोरोनामुळे जि.प.शाळांच्या सर्व्हेला ‘बाधा’

कोरोनामुळे जि.प.शाळांच्या सर्व्हेला ‘बाधा’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : एकीकडे कोरोनामुळे जिल्ह्यातील एकही शाळा अद्यापही सुरू होऊ शकलेली नाही. दुसरीकडे जिल्ह्यात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांचा सर्व्हे मागील दोन वर्षांत याच कारणामुळे झाला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या किती शाळा इमारतींसह किती वर्गखोल्या धोकादायक झाल्या आहेत. याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एक हजार ३३० शाळा असून या शाळांमध्ये ७७ हजार ८९२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, परंतु या शाळांमध्ये ९८ शौचालयाची, तीन हजार २२० वर्गखोल्यांमध्ये किचन शेड नसणे, ८९९ शाळांना संरक्षण भिंत आणि ६४६ शाळांना मैदान नसल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.

कोरोनामुळे यंदादेखील शाळा सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे त्यांना घरी बसूनच अभ्यास करावा लागत आहे, परंतु ग्रामीण भागात इंटरनेटची फारशी सुविधा नसल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कसाबसा अभ्यास करावा लागत आहे. दरम्यान, विद्यार्थी शाळेत जात नसताना अशा काळात सर्व्हे करून ज्या शाळांची अवस्था दयनीय झालेली आहे, अशा शाळांची दुरुस्ती करून त्या पुन्हा योग्य कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. असे असेल तरी जिल्हा परिषदेने अशा शाळांचा अद्यापही सर्व्हे केला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे एकूण एक हजार ३३० पैकी किती शाळा, किती शाळांमधील वर्गखोल्यांची अवस्था दयनीय आहे किंवा किती वर्गखोल्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे, याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या तब्बल ७७ हजार ८९२ विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या एकूण शाळांमधील ९८ शाळांमध्ये शौचालयच नाही. त्यामध्ये ६७ मुलींसाठी आणि ३१ मुलांसाठीच्या शौचालयांचा समावेश आहे. दुसरीकडे तीन हजार २२० वर्गखोल्यांमध्ये किचन शेड नसणे, ८९९ शाळांना संरक्षण भिंत आणि ६४६ शाळांना मैदान नसल्याची माहिती यानिमित्ताने समोर आली आहे,परंतु या शाळांमधील किती वर्गखोल्या किंवा शाळा इमारत धोकादायक किंवा किती शाळांची इमारत दुरुस्त करणे गरजेचे आहे याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

जिल्ह्यातील एकूण शाळा - १,३३०

एकूण विद्यार्थी - ७७,८९२

वर्गखोल्यांची दुरुस्ती आवश्यक - माहिती उपलब्ध नाही

कोणत्या तालुक्यात किती धोकादायक? -माहिती उपलब्ध नाही

तालुका शाळा

अंबरनाथ - ११४

भिवंडी - ३०८

कल्याण - १२०

मुरबाड - ३२९

शहापूर - ४५७

Web Title: Corona 'hinders' ZP school survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.