शिमग्यानिमित्त कोकणात जाणाऱ्या एसटी बुकिंगला कोरोनाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:42 AM2021-03-17T04:42:04+5:302021-03-17T04:42:04+5:30
ठाणे : शिमग्यानिमित्त कोकणात सोडण्यात येणाऱ्या एसटीला यंदा कोरोनाचा फटका बसला आहे. शिमग्यानिमित्त कोकणात दरवर्षी जाणाऱ्या एसटी हाऊसफुल्ल असतात. ...
ठाणे : शिमग्यानिमित्त कोकणात सोडण्यात येणाऱ्या एसटीला यंदा कोरोनाचा फटका बसला आहे. शिमग्यानिमित्त कोकणात दरवर्षी जाणाऱ्या एसटी हाऊसफुल्ल असतात. यंदा मात्र उलटे चित्र आहे. ठाणे शहरातील कोकणवासीयांनी कोरोनाच्या निर्बंधांमुळे एसटीचे बुकिंग केले नसल्याचे पाहायला मिळत आहे. ठाणे शहरातून यावर्षी शिमग्यानिमित्त ४९ एसटी सोडण्यात येणार आहेत. परंतु दोन आठवड्यावर होळीचा सण येऊनदेखील केवळ दोनच एसटीची बुकिंग झाल्याची माहिती एसटी महामंडळ, ठाणे विभागाने ‘लोकमत’ला दिली.
होळी हा कोकणवासीयांसाठी मोठ्या सणांपैकी एक आहे. कोकणात गणेशोत्सव आणि होळी या दोन सणांचे विशेष आकर्षण असते. त्यानिमित्ताने या सणांना चाकरमान्यांची पावले आपोआपच आपल्या गावाकडे फिरतात. शहरातील कोकणवासी रेल्वे, एसटीने जाणे पसंत करतात. रेल्वेनंतर बसची सोय फारच फायदेशीर ठरते. शिमग्याला जाण्यासाठी महिनाभरआधी चाकरमानी एसटीचे बुकिंग करतात. बुकिंग वाढले की एसटी महामंडळाला जादा गाड्या सोडण्याची वेळ येते. गेल्या वर्षी एसटी बुकिंगचे जे चित्र होते त्याच्या उलट चित्र यंदा पाहायला मिळत आहे. २०२० साली एसटीच्या बुकिंग हाऊसफुल्ल होत्या. त्यावेळी महामंडळाला जादा एसटी सोडाव्या लागल्या होत्या. गेल्या वर्षी ठाणे शहरातून ६३ गाड्या सोडल्या होत्या. गेल्या वर्षी होळीच्या दिवसांत लाॅकडाऊन जाहीर झाले नसल्याने अनेक चाकरमान्यांनी कोकणाकडे धाव घेतली होती. ७ ते १२ मार्च २०२० या कालावधीत गाड्या सोडल्या होत्या. यंदा शिमग्यासाठी ठाणे शहरातून २६ ते ३० मार्च या कालावधीत एसटी सोडण्यात येणार आहेत. ३ फेब्रुवारीपासून एसटीच्या बुकिंगलादेखील सुरुवात करण्यात आली. पण अद्याप १० टक्केही बुकिंग नाही. २६ मार्च रोजी १९ गाड्या, २७ मार्च रोजी २० गाड्या, २८ मार्च रोजी ८ गाड्या, २९ मार्च रोजी एक गाडी, ३० मार्च रोजी एक गाडी अशा ४९ गाड्या सोडण्यात येणार आहेत. परंतु यात केवळ २७ मार्च रोजी सोडण्यात येणाऱ्या २० गाड्यांपैकी दोनच गाड्या फुल्ल झाल्या आहेत. अद्याप ४७ गाड्या या प्रवाशांच्या प्रतीक्षेत आहेत. कोरोनाच्या निर्बंधामुळे यंदा शिमग्यासाठी एसटीची बुकिंग नसल्याचे एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाने सांगितले.