ठाण्यात लोकप्रतिनिधी महिलेला कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 06:18 PM2020-04-30T18:18:20+5:302020-04-30T18:18:51+5:30
दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतांना आता एका महिला लोकप्रतिनिधीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तिच्यावर आता खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे आता लोकप्रतिनिधींमध्येही चितेंचे वातावरण पसरू लागले आहे.
ठाणे : कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव हा ठाणेकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. यामध्ये आरोग्य सेवेतील कर्मचारी, अधिकारी, पत्रकार, पोलीस, शासकीय यंत्रणेतील कर्मचारी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यात आता ठाण्यातील एका लोकप्रतिनिधीला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या लोकप्रतिनिधीसह अन्य तीघांचेही रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
ठाणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंब्रा, कळवा पाठोपाठ आता वागळे, लोकमान्य नगर, कोपरी या भागात आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती पालिकेच्या आकडेवारीवरुन समोर येत आहे. आतापर्यंत कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ही ३०० च्या पार गेली आहे. मागील काही दिवसात कोपरी, वागळे इस्टेट या भागात कोरोनाचे रुग्ण वाढतांना दिसत आहेत. कोपरी हा परिसर तर ग्रीन झोन म्हणून पालिकेने घोषीत केला होता. परंतु अवघ्या काही दिवसात हा परिसर रेड झोन झाला आहे. वागळे पट्यातील सीपी तलाव या भागात तर कोरोनाचे सर्वाधीक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस हा संसर्ग वाढत असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यात आता एका लोकप्रतिनिधीची देखील भर पडली आहे. एका लोकप्रतिनिधीलाच कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परंतु त्यालाही ही लागण कशी झाली, कोणामुळे झाली याचा तपास आता केला जात आहे. तर त्याच्या संपर्कातील इतर तीघांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. परंतु आता त्या लोकप्रतिनिधीचे पती आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांचीही तपासणी केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.