कोरोनामुळे २४ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:39 AM2021-05-24T04:39:01+5:302021-05-24T04:39:01+5:30
--------------------------------------- २२४ जणांवर कारवाई कल्याण : केडीएमसीच्या हद्दीत मास्क न घालता बाहेर फिरणाऱ्यांविरोधात पोलीस आणि मनपाकडून दंडात्मक कारवाई सुरू ...
---------------------------------------
२२४ जणांवर कारवाई
कल्याण : केडीएमसीच्या हद्दीत मास्क न घालता बाहेर फिरणाऱ्यांविरोधात पोलीस आणि मनपाकडून दंडात्मक कारवाई सुरू आहे. शनिवारी अशा २२४ व्यक्तींवर कारवाई करून त्यांच्याकडून एकूण १ लाख १२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर विनाकारण फिरणाऱ्या ५०२ जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली. यात दोन जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
--------------------------------------
आज पहिल्या व दुसऱ्या डोसचे लसीकरण
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सोमवारी हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ४५ वर्षांवरील नागरिकांच्या कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण केले जाणार आहे. कल्याण पूर्वेतील नेतिवली येथील प्रबोधनकार ठाकरे शाळा लसीकरण केंद्र आणि डोंबिवली पूर्वेतील सावळाराम क्रीडा संकुल लसीकरण केंद्र या केंद्रावर सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरण केले जाणार असल्याची माहिती मनपाच्या वतीने देण्यात आली. तर उर्वरित १५ लसीकरण केंद्रांवरही कोविशिल्ड लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसची व्यवस्था लस संपेपर्यंत केली आहे.
----------------------------------------
सोनसाखळी चोरी
डोंबिवली : पश्चिमेतील नवापाडा परिसरात राहणारी ५५ वर्षीय महिला पतीसमवेत भागशाळा मैदान येथे रविवारी सकाळी ५.३० वाजता मॉर्निंग वॉक करीत असताना तिच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची दोन सोन्याची मंगळसूत्रे चोरट्याने हिसकावून पलायन केले. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
----------------------------------------
सोन्याचे दागिने लंपास
डोंबिवली : पूर्वेतील अयोध्यानगरी परिसरातील कृश बिल्डिंगमध्ये राहणारे चंद्रशेखर लिंगायत यांच्या घरातून ४१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना बुधवारी दुपारी सव्वाएक ते पावणेदोनच्या दरम्यान घडली. लिंगायत यांनी याप्रकरणी त्या कालावधीत त्यांच्याकडे पेस्ट कंट्रोल करण्यासाठी आलेल्या सतीश साळे याच्यावर संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून टिळकनगर पोलीस ठाण्यात साळे विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
-----------------------------------------
रिक्षाची चोरी
डोंबिवली : अंजनीकुमार सिंग यांनी त्यांची रिक्षा ठाकुर्ली चोळेगाव परिसरात गुरुवारी पार्क केली होती. तेथून ती रिक्षा चोरीला गेल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
-------------------------------------------
चालकावर गुन्हा
डोंबिवली : रस्त्यावर खेळताना अमित धाकड या १२ वर्षीय मुलाचा कचऱ्याच्या गाडीखाली सापडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी कल्याण पूर्व भागातील हनुमाननगर परिसरात घडली होती. याप्रकरणी अमितचा भाऊ रोहित याने दिलेल्या तक्रारीवरून वाहनचालक दीपक ठोंबरे याच्यावर टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
------------------------------------------------