उल्हासनगरात कोरोना रुग्ण व डॉक्टरांना एकाच दर्जाचे जेवण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 05:06 PM2020-07-27T17:06:44+5:302020-07-27T17:09:26+5:30
दिवसाला एका रुग्णावर ३१८ रुपये जेवणासाठी खर्च केले असून, अग्निशमन दलाच्या जवानांसाठी तब्बल १२ हजार किमतीचा गमबूट खरेदी केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
उल्हासनगर : महापालिकेने डॉक्टर, कर्मचारी व कोरोना रुग्णांना एकाच दर्जाचे जेवण दिले असून, तीन महिन्यात जेवणावर तब्बल २ कोटींचा खर्च आला. तर पिण्याच्या बॉटल बंद पाण्यावर ५० लाखांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. दिवसाला एका रुग्णावर ३१८ रुपये जेवणासाठी खर्च केले असून, अग्निशमन दलाच्या जवानांसाठी तब्बल १२ हजार किमतीचा गमबूट खरेदी केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
उल्हासनगर महापालिका स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या ऑनलाइन सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी एकमताने सर्वच विषयाला मान्यता दिली. रुग्ण, डॉक्टर व इतर कर्मचारी यांच्या जेवणावरील खर्च, अग्निशमन विभागाला लागणारे साहित्य खरेदी, बॉटल बंद पिण्याचे पाणी, जंतूनाशक औषध खरेदी आदी विषयाला सभेत मंजुरी देण्यात आल्याची माहिती स्थायी समिती सभापती राजेश वधारिया यांनी दिली. एकूण कोरोना रुग्ण, विलगीकरण कक्षात ठेवलेले संशयित रुग्ण, डॉक्टरसह इतर कर्मचारी यांना २३ मार्च ते १० जुलैपर्यंत देण्यात आलेल्या जेवण व पिण्याच्या पाण्यावर सव्वा कोटी व ३२ लाख खर्च आला. तसेच २३ मार्च ते १२ जूनदरम्यान जेवणाच्या थाळीत अंडी, फळे व दुधाची भर पडली.
महापालिकेने जेवणाबाबत रुग्ण, डॉक्टरसह इतर कर्मचारी यांच्यात कोणताही भेदभाव न करता एकाच दर्जाचे जेवण दिल्याची माहिती सहायक आयुक्त मनीष हिवरे यांनी दिली. एका रुग्णाच्या जेवणावर दिवसाला ३१८ रुपये खर्च आल्याचे हिवरे म्हणाले. पालकमंत्री एकनाथ शिंदे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या रुग्णालय भेटीनंतर रुग्णांसह डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांच्या जेवणात फळे, दूध व अंडी देण्यात येऊ लागली. १३ जून ते ११ जुलै दरम्यानच्या २८ दिवसांत जेवणावर ८० लाखांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला असून बॉटल बंद पिण्याच्या पाण्यावर १८ लाख रुपये खर्च झाला. यासर्व खर्चाला स्थायी समिती सभेत सोमवारी मान्यता देण्यात आली. एका जणाच्या जेवणावर ३१८ रुपये दिवसाला खर्च पालिकेने दाखवूनही मध्यंतरी डॉक्टर व रुग्णांनी निकृष्ट दर्जाचे जेवण असल्याचे आरोप करून त्यांनी महापालिकेवर धडक दिली होती. मात्र स्थायी समितीत एकमताने सर्वच खर्चाच्या विषयाला मान्यता देण्यात आल्याने वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.
वस्तूच्या अवास्तव किमतीची सर्वत्र चर्चा
महापालिकेने निविदा न काढता अग्निशमन विभागासाठी ४५ लाखाच्या विविध वस्तूची खरेदी केली. यामध्ये अग्निशमन जवानांसाठी लागणारा एक गम बुट तब्बल १२ हजार पेक्षा जास्त किमतीला खरेदी केला. तसेच १ कोटी किमतीचे फवारणीसाठी लागणारे औषध व जंतुनाशक व घरोघरी जावून ऑक्सिजन तपासणीसाठी लागणारे एकूण १५०० थर्मल स्कॅनर मशीन खरेदी केले आहे. या सर्वांच्या किमतीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे.