कोरोना, निसर्ग चक्रीवादळाचे गणेशोत्सवात विघ्न, मूर्तिकार चिंतित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 12:56 AM2020-06-10T00:56:54+5:302020-06-10T00:56:59+5:30
मूर्तिकार चिंतित : बुकिंगही १० ते १५ टक्क्यांवर
प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : गणेशोत्सवाबाबत सरकारने अद्याप कोणतेही धोरण जाहीर न केल्यामुळे मूर्तिकारांबरोबर गणेशभक्तही चिंतित आहेत. कोरोना आणि निसर्ग चक्रीवादळाचे विघ्न मूर्तिकारांवर आले आहे, त्यातच सरकार भूमिका स्पष्ट करीत नसल्याने मूर्तिकार, गणेश भक्त आणि मंडळेही द्विधा परिस्थितीत आहेत. त्यामुळे दरवर्षी या महिन्यात ५0 टक्क्यांपेक्षा जास्त होणारी बुकिंग यंदा १0 ते १५ टक्क्यांवर आल्याचे ठाण्यातील मूर्तिकारांनी सांगितले.
गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर आला आहे. आधीच कोरोनाचे संकट आणि आता निसर्ग चक्रीवादळाचा फटका मूर्तिकारांना बसला आहे. वाहतूक, कच्चा माल, कारागिरांची कमतरता, भक्तांच्या मनातील भीती यामुळे मूर्तिकार चिंतेने ग्रासले आहेत. ठाण्यात पेणहून कच्च्या गणेशमूर्ती बनवून येतात आणि येथील मूर्तिकार त्या मूर्तींचे रंगकाम करतात. जसजसा गणेशोत्सव जवळ येतो तसतशी मूर्तिकारांच्या कामाची गती वाढत जाते. परंतु यंदा उत्सव साजरा करायचा की नाही, किंवा तो कशा पद्धतीने करायचा? याबाबत सरकारने काहीही जाहीर न केल्यामुळे मूर्ती बनविण्यापासूनच मोठी अडचण निर्माण झाली आहे.
ज्या भागात मूर्ती बनविल्या जातात तिथे निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला आहे. त्यामुळे तेथील कामही थांबले आहे. दरवर्षीच्या ठरलेल्या भक्तांना बुकिंगसाठी मेसेज केले तर त्यांच्या मनातही उत्सव साजरा करण्याबाबत शंका आहे. त्यामुळे तेही थांबले आहेत.
वाहतूक होत नसल्याने रंगकामाचे साहित्यही आणू शकत नाही, असे सचिन आणि राजेश गावकर या मूर्तिकारांनी सांगितले. वाहतुकीबाबत सरकार काही सांगत नाही. त्यामुळे सरकारने घरगुती गणेशोत्सवाबाबत तरी भूमिका जाहीर करावी, असे मूर्तिकार अरुण बोरिटकर म्हणाले.