कोरोना: जमावबंदी आदेशाच्या काळात लग्न समांरंभालाही १०० पेक्षा जास्त व-हाडींना बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 12:52 AM2020-03-24T00:52:21+5:302020-03-24T01:07:12+5:30
ठाण्यात आता जमावबंदीसह संचारबंदीही लागू झाली आहे. त्यामुळे या काळात पूर्वनियोजित शुभमंगल करण्यावर तसेच दुर्दैवाने एखाद्याचा मृत्यु ओढवला तरी कमाल ५० व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये अंत्यविधी करण्याचे निर्देश पोलिसांच्या जमावबंदीच्या आदेशामध्ये दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे शहरात कलम १४४ नुसार जमावबंदी आदेश लागू करण्यात आले असून या काळात दुर्देवाने एखाद्याचा मृत्यु झालाच तर ५० व्यक्तींमध्ये अंत्यविधी करण्यात यावा. तसेच पूर्वनियोजित विवाह संमारंभ हा १०० व्यक्तींसाठी मर्यादित ठेवण्यात यावा, असे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी काढले आहेत.
हा मनाई आदेश २३ मार्च रोजी पहाटे ५ ते ३१ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील, असे कार्यक्रम, समारंभ, सण, उत्सव आणि यात्रा, मनोरंजानाचे कार्यक्रम, क्रीडा तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा आदींना मनाई राहणार आहे. आंदोलन, मेळावे, मिरवणूक तसेच देशांतर्गत आणि परदेशी सहलींच्या आयोजनालाही मनाई राहणार आहे. या काळात खाद्यगृह, खानावळ, शॉपिंग कॉम्पलेक्स, मॉल्स, सूपर मार्केट सर्व मनोरंजनाची ठिकाणे, क्रिडांगणे, मैदाने, सिनेमागृह, शाळा आणि महाविद्यालय आदी सर्व बंद राहणार आहेत.