सक्रिय नगरसेवकांना कोरोनाची बाधा; फोन, व्हॉट्सअ‍ॅप, व्हिडीओ कॉलिंगचा घेतला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 12:21 AM2020-08-29T00:21:54+5:302020-08-29T00:22:24+5:30

मदतीचे वाटप, काहींची पीपीई किट घालून रुग्णालयात धाव

Corona obstruction to active corporators; Supported by phone, WhatsApp, video calling | सक्रिय नगरसेवकांना कोरोनाची बाधा; फोन, व्हॉट्सअ‍ॅप, व्हिडीओ कॉलिंगचा घेतला आधार

सक्रिय नगरसेवकांना कोरोनाची बाधा; फोन, व्हॉट्सअ‍ॅप, व्हिडीओ कॉलिंगचा घेतला आधार

googlenewsNext

कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव मार्च महिन्यात कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत झाला, तेव्हा कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी काही नगरसेवकांनी घराबाहेर न पडता फोन, व्हॉट्सअ‍ॅप आणि व्हिडीओ कॉलिंगद्वारे नागरिकांशी संपर्क ठेवला. त्या काळात त्यांची कार्यालये कुलूपबंद होती. जे नगरसेवक सोशल मीडियाच्या वापराबाबत फारसे आग्रही नव्हते, त्यांनी कार्यालये सदैव उघडी ठेवून मदतीचा ओघ सुरू ठेवला. काहींना कोरोनाशी सामना करताना जीव गमावावा लागला. महापालिका हद्दीत सुरुवातीला सामान्य जनतेला अन्नधान्य, भाजीपाला उपलब्ध करून देण्याचे ठिकठिकाणी काम केले गेले. मुदलात केडीएमसीचे बहुतांश नगरसेवक कोरोनाकाळात सक्रिय होते.

कल्याण पूर्वेतील शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी अन्नधान्यवाटप केले. तसेच दररोज जेवणाची सोय केली. घरोघरी जाऊन मदतीचा हात दिला. केवळ फोनवर उपलब्ध न होता स्वत: जनतेत मिसळून काम केले. रुग्णालयाकडून लूट केली जात असताना पीपीई किट घालून रुग्णांच्या मदतीसाठी रुग्णालयात धाव घेतली. कोरोनाकाळात रस्त्यावरील खड्डे बुजवले जात नव्हते, तेव्हा त्यांनी रस्त्यावर उतरून काम केले. आडिवली-ढोकळी परिसरातील अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी त्यांच्या कार्यालयातून अन्नधान्यवाटप, भाजीपालावाटपाचे काम केले. तसेच स्वत: पीपीई किट घालून थर्मल स्कॅनिंग करण्याचे काम केले. रुग्णालयास व्हेंटिलेटरही दिले.

शिवसेना नगरसेवक सचिन बासरे यांनी तब्बल तीन महिने आमदार विश्वनाथ भोईर यांच्या वतीने जेवणाचे वाटप केले. शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी रात्रीच्या वेळेस त्यांच्या प्रभागात निर्जंतुकीकरणाचे काम केले. त्यांनीही अन्न व भाजीपालावाटपाचे काम केले. सॅनिटायझर, मास्कचे वाटप केले. भाजप नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी सामान्यांना रेशनचे धान्य योग्य प्रकारे वाटप केले जात आहे की नाही, यावर देखरेख ठेवत मदतीचा हात दिला. भाजप नगरसेवक मनोज राय यांनी दोन महिने १५ टनांपेक्षा जास्त अन्नधान्याचे वाटप केले. त्या काळात त्यांच्या आईचे निधन झाले, तरी त्यांनी मदतीचे काम थांबविले नाही. शिवसेना नगरसेवक मोहन उगले यांनी अन्नधान्य व भाजीपाल्याचे वाटप केले. त्यांना मधुमेहाचा आजार असतानाही त्यांनी कोरोनाकाळात मदतीचे काम केले. शिवसेना नगरसेवक राजेश मोरे यांनी रात्रंदिवस कोरोना रुग्णांसाठी काम केले. महापौर विनीता राणे याही पीपीई किट घालून रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या.

काहींनी कार्यालये ठेवली कुलूपबंद, कोरोनामुळे भेट घेणे टाळले
कोरोनाकाळात मदतीचे काम करीत असताना शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी, नवीन गवळी यांना कोरोनाची लागण झाली. त्यातून ते बरे झाले. तसेच स्थायी समिती सदस्य पुरुषोत्तम चव्हाण यांनाही कोरोना झाला. तेही बरे झाले. सातत्याने प्रभागात स्वत: जंतुनाशकफवारणी करणारे अपक्ष नगरसेवक काशीफ तानकी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरे झाले. शिवसेना नगरसेवक व गटनेते दशरथ घाडीगावकर यांना मदतकार्य करीत असताना कोरोनाची लागण झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच परिवहन समिती सदस्य नाना यशवंतराव यांचाही कोरोनासदृश आजाराने मृत्यू झाला. ते जनतेत मिसळून काम करणारे कार्यकर्ते होते. काही सदस्यांनी कोरोनाच्या भीतीपोटी जनतेला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. परंतु, त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत मदतीचे वाटप केले. अनेकांनी केवळ मेसेज, व्हॉट्सअ‍ॅप कॉल, व्हिडीओ कॉलद्वारे आॅनलाइन संपर्क साधला. या सदस्यांविरोधात नागरिकांमध्ये रोष होता. काहींनी तर कार्यालये कुलूपबंद ठेवली होती. कोरोनाचे कारण देत भेट घेणे टाळले.

 

Web Title: Corona obstruction to active corporators; Supported by phone, WhatsApp, video calling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.