कोरोना प्रादुर्भावाचा उत्पादन शुल्क विभागाला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:30 AM2021-05-30T04:30:52+5:302021-05-30T04:30:52+5:30
पालघर : राज्यासह जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्योग, व्यवसाय व पर्यटनावर झालेल्या परिणामांचा मोठा फटका राज्य उत्पादन शुल्क ...
पालघर : राज्यासह जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्योग, व्यवसाय व पर्यटनावर झालेल्या परिणामांचा मोठा फटका राज्य उत्पादन शुल्क विभाग पालघरला बसला आहे. एका वर्षात १ अब्ज ४८ कोटी ८८ लाख १८ हजार ४२६ रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.
राज्याच्या तिजोरीला भक्कम आर्थिक स्थैर्य देण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क विभाग करीत असून, पालघर विभागाने मागच्या दोन वर्षांत १९ अब्ज ८ कोटी ९३ लाख ६ हजार ३३४ रुपयांचा महसूल राज्य शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात यश मिळविले आहे.
२०१९-२० मध्ये ३ कोटी ४५ लाख १३ हजार १३६ लिटर मद्यविक्री करताना १२ अब्ज ८ कोटी ९० लाख ६२ हजार ३८० रुपयांचा महसूल शासनाला मिळवून दिला होता. मात्र, सततच्या लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसाय बंदी व त्याचा पर्यटन व्यवसायावर परिणाम होऊन महसुलात मोठी घट झाली होती. परिणामी सन २०२०-२१ सालात २ कोटी ८२ लाख ५८ हजार ५६५ लिटर मद्यविक्री होऊन ८ अब्ज ८० कोटी २ लाख ४३ हजार ९५४ रुपयांचा महसूल मिळवून देण्यात पालघर विभागाला यश आले; परंतु एका वर्षात या लॉकडाऊनच्या फटकाऱ्याने परमिट रूम, वाइन शॉप, बीअर शॉप, पर्यटनस्थळे बंद असल्याचा मोठा फटका राज्य उत्पादन शुल्क विभागाला बसला आहे. दुसरीकडे परमिट रूम, बार, वाइन शॉप, बीअर शॉपी यांनी वार्षिक फीही भरली नसल्याने पालघर राज्य उत्पादन विभागाच्या महसुलाला १ अब्ज ४८ कोटी ८८ लाख १८ हजार ४२६ रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता.
कोरोनामुळे उद्योग, व्यवसाय व पर्यटनावर झालेल्या परिणामांमुळे विक्री कमी झाली. त्याचा परिणाम महसुलावर झाला आहे.
- डॉ. विजय भूकन, जिल्हा अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पालघर