कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५० टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 12:24 AM2020-06-05T00:24:31+5:302020-06-05T00:24:44+5:30
चार हजार ७७१ रुग्णांनी केली मात : ५१ हजारांची केली चाचणी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या चार हजार ४०४ रुग्णांवर गुरुवारपर्यंत उपचार सुरू असून आतापर्यंत चार हजार ७७७ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ५०.३१ टक्के आहे. आतापर्यंत जिल्ह्यात नऊ हजार ४८४ रुग्णांची नोंद झाली आहे.
ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर या भागात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका तसेच ग्रामीण भागात आज अखेरपर्यंत कोरोनाची लक्षणे आढळलेल्या ५१ हजार ४३ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ३९ हजार ३५० व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली नसल्याचे आढळून आले. आहे. आतापर्यंत ३०९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ठाणे शहरात प्रत्यक्ष उपचार घेत असलेले १८०२ रुग्ण असून आतापर्यंत १,५४४ रुग्ण बरे झाले असून १०३ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत ६१२ रुग्ण असून ५८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत ८८५ रुग्ण असून १,५१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ७८ जणांचे या आजारामुळे निधन झाले. मीरा-भार्इंदरमध्ये प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २८५ असून ११४ जण बरे झाले असून ४१ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये २९६ रुग्ण उपचार घेत असून ११४ जण बरे झाले आहेत. मात्र, १७ जण कोरोनाविरुद्धची लढाई हरले.
भिवंडीमध्ये १०७ रुग्ण उपचार घेत असून ७९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ११ जणांचा मृत्यू झाला आहे. अंबरनाथमध्ये १२४ रुग्ण उपचार घेत असून ८३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, सात जणांचे निधन झाले. बदलापूरमध्ये १२४ रुग्ण असून १३० रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर सात जणांचा मृत्यू झाला. ठाणे ग्रामीण भागात १६९ रुग्णांवर उपचार सुरू असून २३७ जणांनी कोरोनावर मात केली असून नऊ जणांचे मृत्यू झाले.
कल्याण-डोंबिवलीत ४७ नवे रुग्ण
च्कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत गुरुवारी कोरोनाचे नवे ४७ रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या एक हजार २७५ झाली आहे. तर, आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांमध्ये पाच लहान मुले, तर २० पुरुष आणि २२ महिला आहेत.
च्कल्याण पूर्वेतील २०, पश्चिमेतील सहा, डोंबिवली पूर्वेतील सात, टिटवाळ्यातील पाच जणांनाही लागण झाली आहे. उपचाराअंती घरी गेलेल्यांची संख्या ५९५ आहे. तर, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६४६ आहे.