Corona in Thane ठाणे जिल्ह्याचा आकडा दोन हजारी; आणखी तिघे दगावले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 08:26 PM2020-05-09T20:26:50+5:302020-05-09T20:27:09+5:30
शनिवारी सापडले 184 नवे कोरोना रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी दोन हजारांचा टप्पा पार केला असून जिल्ह्यात शनिवारी नवे 184 रुग्णांची नोंद झाली आहेत. या नव्या रुग्णांनी जिल्ह्यातील रुग्णांची 2006 झाली आहे.तसेच तिघांच्या मृत्यूने मृतांची संख्या ही 49 वर पोहोचली आहे. 24 तासात नवीमुंबईत सर्वाधिक 65 नवे रुग्ण मिळून आले असून भिवंडीत एक ही नवा रुग्ण नोंदवला गेला नाही. दुसरीकडे कल्याण- डोंबिवली महापालिकेने तिनशेचा आकडा पार केल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.
शनिवारी नवीमुंबई महापालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक 65 रुग्ण सापडल्याने येथील रुग्णांची संख्या ही 592 वर पोहोचली आहे. तसेच आजही नवीमुंबईत दोघांचा मृत्यू झाल्याने तेथील मृतांची संख्या 12 झाली आहे. तर ठाणे महापालिकेत नव्या 60 रुग्णांमुळे तेथील एकूण रुग्ण संख्या 671 इतकी झाली आहे. ठामपाच्या मुंब्रा प्रभाग समितीत नवे 14 रुग्ण, वागळे इस्टेट 12 आणि लोकमान्यनगर-सावरकरनगर या समितीअंतर्गत 11 रुग्ण सापडले आहेत. त्या नव्या रुग्णांमध्ये 38 पुरुष रुग्ण आणि 22 महिला रुग्णांचा समावेश आहे.
कल्याण- डोंबिवलीतही 25 नवे रुग्ण आढळल्याने तेथील रुग्ण संख्येने तिनशेचा आकडा पार केला असून एकूण रुग्ण 305 झाले आहेत.यामध्ये 14 रुग्ण डोंबिवली आणि 10 रुग्ण कल्याण येथील आहेत.त्यातच एकाचा मृत्यू झाला असून तेथील मृत रुग्णांची संख्या चार वर गेली आहे. मिराभाईंदर येथे नवे 7 रुग्णांची नोंद झाल्याने रुग्ण संख्या 242 वर गेली आहे. उल्हासनगर येथे नवे 16 रुग्ण आढळून आल्याने रुग्ण 34 झाली आहे.
ठाणे ग्रामीण आणि बदलापूर येथे प्रत्येकी 5 नवे रुग्ण सापडले आहेत. तेथील रुग्ण संख्या अनुक्रमे 77 आणि 51 इतकी झाली आहे. एक नवीन रुग्ण अंबरनाथ येथे नोंदवल्याने तेथील रुग्ण संख्या 13 झाली आहे. तर भिवंडीत एक ही नवीन रुग्ण न सापडल्याने तेथील रुग्ण संख्या 21 वर स्थिर राहिल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.