ठामपाच्या दुर्लक्षामुळे कोरोना रुग्णाची आत्महत्या; निरंजन डावखरे यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 11:35 PM2020-09-07T23:35:55+5:302020-09-07T23:36:00+5:30
समुपदेशक नेमण्याकडे होतेय दुर्लक्ष
ठाणे : कोरोना रुग्णांची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात समुपदेशक नेमण्याच्या मागणीकडे महापालिकेकडून सातत्याने दुर्लक्ष केले आहे. रुग्णांच्या मानसिक स्थितीबाबत महापालिकेला गांभीर्य नसल्याची बाब दुर्दैवी आहे. या प्रकारामुळेच ग्लोबल रुग्णालयात आत्महत्येची घटना घडली, असा आरोप भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
बाळकुम येथील कोरोना विशेष रुग्णालयात दादा पाटीलवाडी येथील वृद्ध रुग्ण भिकाजी वाघुले (वय ७२) यांनी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यापूर्वीही या रुग्णालयात दोघा जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सुदैवाने त्यांचे प्राण वाचले होते. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रभारी डॉ. किरीट सोमय्या, आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी नुकतीच महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेऊन कोरोना रुग्णालयात कौन्सिलर ठेवण्याची मागणी केली होती. त्यावेळी पालिकेच्या वतीने रुग्णालयांमध्ये समुपदेशकांची (कौन्सिलर) नियुक्ती करण्यात येईल, पीपीई किट घालून समुपदेशकांकडून प्रत्येक रुग्णाशी संवाद साधला जाईल, असे आश्वासन डॉ. शर्मा यांनी दिले होते. मात्र, ते अद्याप पूर्ण झालेले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.