पुन्हा कोरोना रुग्ण! ठाणे महापालिका हद्दीतील १९ वर्षीय तरुणीला लागण
By अजित मांडके | Published: December 19, 2023 11:48 PM2023-12-19T23:48:37+5:302023-12-19T23:48:59+5:30
पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. अशातच पुन्हा नव्याने मंगळवारी सायंकाळी कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णांवर ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
कोरोना या महामारी आजारामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकविला होता. त्यात मागील दोन ते तीन वर्षांपासून हा आजार हद्दपार झाल्याने आरोग्य यंत्रणेसह सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र मंगळवारी सायंकाळी ठाणे महापालिका हद्दीत एक १९ वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण झाली असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या तरुणीवर ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात येत असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच त्या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी एनआयव्ही पुणे येथे पाठविण्यात येणार असून तेथील अहवाल नंतरच कोरोनाचा कोणता व्हेरियंट आहे, याची माहिती समोर येईल अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध माळगांवकर यांनी दिली.