ठाणेकर नागरिकांनो सावधान, कोरोनाने केले डोकेवर; दिवसभरात शहरात एका मृत्यूची नोंद
By अजित मांडके | Published: March 16, 2023 09:31 PM2023-03-16T21:31:19+5:302023-03-16T21:31:47+5:30
सक्रिय रुग्णांची संख्या शंभराच्या पार
ठाणे: शनिवार आणि सोमवारनंतर पुन्हा एकदा गुरुवारी ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने उसळली घेतली आहे. आजच्या दिवसभरात जिल्ह्यात तब्बल ४० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये २८ रुग्ण हे ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात नोंदवले गेले आहेत. तर शहरात एका मृत्यू ची नोंद झाली आहे. कळवा रुग्णायलात उपचार सुरू होते. त्याचे वय अंदाजे ८० च्या पार असल्याची माहिती पालिकेने दिली. तर आठवड्यात वाढलेल्या कोरोना रुग्णांमुळे आता सक्रिय रुग्णांचा आकडा शंभराच्या पार गेला आहे. तर निम्म्याहून अधिक सक्रिय रुग्ण ठामपा हद्दीत उपचारार्थ दाखल आहेत. तर एकूण सक्रिय रुग्णसंख्या ही १३३ झाली आहे .
शनिवारी (११ मार्च) जिल्ह्यात १६ रुग्ण तर सोमवारी (१३ मार्च) १३ रुग्ण नोंदवले गेले. त्यानंतर बुधवारी (१५ मार्च) २४ नव्या रुग्णांची भर पडली आहे. या वाढत्या रुग्ण संख्येने सक्रिय रुग्णांची संख्या ही चांगलीच वाढली होती. ती संख्या आता १३३ इतकी झाली आहे. ठामपा हद्दीत गुरुवारी २८ नोंदवलेल्या नव्या रुग्णांमुळे सक्रिय रुग्ण संख्या ८५ वर गेली आहे. तर शहरात एका मृत्यू ची नोंद झाली आहे.
कल्याण डोंबिवली येथे ०३ रुग्ण सापडला असून सक्रिय रुग्णांची संख्या ११ झाली आहे. नवी मुंबईत ७ रुग्ण आढळून आल्याने सक्रिय रुग्ण संख्या १७ इतकी झाली आहे.
उल्हासनगर येथे ० रुग्ण नोंदवला गेला असून सक्रिय रुग्ण संख्या २ आहे. भिवंडी ०१ रुग्ण आढळून आला आहे. सक्रिय रुग्ण संख्या २ आहे. मीरा भाईंदर येथे शून्य रुग्णाची नोंद झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ३ झाली आहे. कुळगाव बदलापूर मध्ये शून्य रुग्णाची नोंद असून सक्रीय रुग्ण ही एकच आहे.मात्र ठाणे ग्रामीण मध्ये ०१ रुग्ण सापडल्याने सक्रिय रुग्ण ही १२ इतकी झाली आहे अशी माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली. रुग्ण संख्या वाढत असल्याने ठाणे कर नागरिकांनी कोरोनाच्या त्रिसूत्रीचा कटाक्षाने पालन करावे असे आवाहन ही केले जात आहे.