CoronaVirus News: टॅगमुळे ओळखता येणार कोरोनाचे रुग्ण; शिवसेना नगरसेवकाचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 01:08 AM2020-06-14T01:08:33+5:302020-06-14T01:08:43+5:30
केडीएमसीला दिले १० हजार टॅग
कल्याण : अनलॉक १ मध्ये सर्व प्रकारची दुकाने उघडली असून, काही प्रमाणात बस व रिक्षा सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे शहरांमध्ये नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत कोरोना संशयित, होम क्वारंटाइन आणि पॉझिटिव्ह रुग्ण ओळण्यासाठी टॅगचा उपाय शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सुचविला आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे त्यांनी त्यासाठी १० हजार टॅग सुपूर्द केले आहेत. महापालिका आता या टॅगचा वापर करणार आहे.
म्हात्रे यांनी हे टॅग तयार करून घेतले असून, ते वॉटरफ्रूफ आहेत. हे टॅग वापरल्यावर हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के मारणे बंद करता येणार आहे. अनेकदा शिक्के पुसले जातात. त्यामुळे होम क्वारंटाइन असलेल्या काही व्यक्ती त्याचा गैरफायदा घेऊन घराबाहेर पडतात. टॅगमुळे त्याला आळा बसू शकतो. गर्दीतही तीन प्रकारांतील टॅगमुळे कोरोनाचा रुग्ण ओळखता येऊ शकतो. त्याच्यापासून अन्य नागरिक दूर राहून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करू शकतील, असे म्हात्रे म्हणाले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्यसेतू अॅपचा हेतू हाही लोकांना आजूबाजूला कोरोना रुग्ण आहेत का? तुम्ही कन्टेनमेंट झोनमध्ये वावरत आहात का? वगैरे पूर्वसूचना देणे हाच आहे. मात्र त्याकरिता अॅप डाऊनलोड करणाऱ्याने अचूक माहिती देणे गरजेचे आहे. कल्याण-डोंबिवलीत वापरण्यात येणारे टॅग हे हाताला लावायचे आहेत. काही मंडळींनी पॉझिटीव्ह असतानाही हाताचे शिक्के पुसून समाजात वावरण्याचा बेधडक निर्णय घेतला होता. अशाच बेपर्वा मनोवृत्तीची काही मंडळी हा टॅग घरी काढून ठेवून बाहेर फिरण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोनाच्याबाबत रुग्णांच्या प्रामाणिकपणे आपला आजार उघड करण्यास संसर्ग रोखण्यात खूप महत्त्व आहे.
रंगांचा वापर
लाल रंगाचा टॅग हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी, केशरी रंगाचा संशयिताकरिता तर, होम क्वारंटाइन असलेल्यांसाठी पिवळ््या रंगाचा टॅग तयार करण्यात आला आहे.