कल्याण-डोंबिवलीत आणखी १७ ठिकाणी होणार कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:40 AM2021-04-24T04:40:57+5:302021-04-24T04:40:57+5:30
कल्याण :कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत ६२ स्मशानभूमी आहेत. त्यापैकी सहा ठिकाणी शवदाहिनीवरील अंत्यसंस्काराची सुविधा आहे. या व्यतिरिक्त अन्य १७ ...
कल्याण :कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत ६२ स्मशानभूमी आहेत. त्यापैकी सहा ठिकाणी शवदाहिनीवरील अंत्यसंस्काराची सुविधा आहे. या व्यतिरिक्त अन्य १७ ठिकाणच्या स्मशानभूमीत कोरोना मृतदेहांवर लाकडाद्वारे अंत्यसंस्कार करण्याची सुविधा लवकर उपलब्ध करून दिली जाणार आहे. अंत्यसंस्कार हे विनामूल्य करण्यात येणार आहेत, असे महापालिका प्रशासनाने सांगितले.
मुरबाड रोड, बैलबाजार, लालचौकी, विठ्ठलवाडी या कल्याणच्या स्मशानभूमीसह डोंबिवलीतील शिवमंदिर, पाथर्ली या दोन ठिकाणी गॅस शवदाहिनीची व्यवस्था आहे. त्यासह लाकडावरील बर्निंग स्टॅण्डची सुविधादेखील उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त अन्य १७ स्मशानभूमीत कोविड मृतदेहावर अंत्यसंकारासाठी लाकडावर लवकरच विनामूल्य सुविधा दिली जाणार आहे.
कोविड काळातील गैरसोय टाळण्यासाठी डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखान पाडा येथे गॅस शवदाहिनीसह नवीन स्मशानभूमी उभारण्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे. त्याची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. महापालिकेच्या कोविड रुग्णालयात मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहांवर नजिकच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केला जाईल. त्यामुळे कोविड मृतदेहांवर अंत्यविधी होण्यास विलंब लागणार नाही.
येथे होणार अंत्यसंस्काराची सोय
कल्याण पश्चिमेतील प्रेम ऑटो, लाल चौकी आणि डोंबिवलीतील शिवमंदिर स्मशानभूमीत १० बर्निंग स्टॅण्ड लवकरच दुरुस्त करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर नव्याने दोन बर्निंग स्टॅण्ड बसविण्यात येणार आहेत. मोहने, चक्कीनाका कल्याण पूर्व येथे आरसीसी स्मशानभूमी बांधण्याचे कार्यादेश देण्यात आले आहेत. उंबर्डे, सापाड, वाडेघर, गौरीपाडा, ठाकूर्ली, माणगाव, सोनारपाडा आणि घेसर या ७ ठिकाणी नवीन आरसीसी स्मशानभूमी बांधण्याचे प्रस्तावित आहे. काही स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी पैशाची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी पुढे आल्याने प्रशासनाकडून सर्व महत्वाच्या शवदाहिनीच्या ठिकाणी माहितीदर्शक फलक लावले आहेत.
---------------------------------